
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या ‘शक्ती’ वाघाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर आठ दिवस लपवाछपवी का केली, याबाबत प्रशासनाकडे उत्तरच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शक्तीच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल निर्माण झाला आहे.
‘सामना’मध्ये याबाबत बातमी आल्यानंतर पालिका प्रशासन ‘कामा’ला लागले आहे. शक्तीचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे सांगत पुढील सखोल तपासणीसाठी सॅम्पल नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा येथे पाठविण्यात आले आहे. आता अहवालाची प्रतीक्षा आहे. पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2020 मध्ये संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून शक्ती (नर) आणि करीश्मा (मादी) ही रॉयल बंगाल वाघांची जोडी आणली होती. मात्र या दहा वर्षीय वाघाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शक्ती वाघाने 15 नोव्हेंबर रोजी अन्नग्रहण केले नव्हते. त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तसेच औषधोपचारही सुरू होते. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी शक्तीने मांस खाल्ले व पाणीही प्यायले होते. मात्र 17 नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणीसाठी पिंजऱयात नेत असताना त्याला अपस्माराचे झटके आल्याने आणि त्याचा मृत्यू झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. शक्तीला न्यूमोनिया झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपुरातून वाघांची जोडी आणणार
शक्तीच्या मृत्यूनंतर पालिकेने आता नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातून वाघाची जोडी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय, गोरेवाडा नागपूरला पाठवला आहे.





























































