मंदिरात का जावे?

477

>>प्रा. मेधा सोमण<<

देवाची उपासना, भक्ती ही समाजमनाची गरज बनली आहे. पण लांबच लांब लागलेल्या रांगादिवसेंदिवस उसळणारी गर्दीहे सर्व पाहून मनात विचार येतो, देव फक्त देवळातच असतो का…? भेटतो का?

हिंदुस्थानी संस्कृती खूप प्राचीन आहे. प्राचीनकाळी आर्य लोक निसर्गाचीच पूजा करीत असत. कधी कधी निसर्ग रौद्र रूप धारण करीत असे तेव्हा मात्र भीती वाटत असे. म्हणून निसर्गाला प्रसन्न करून घेण्यासाठी निसर्गाच्या स्तुतिपर काव्यरचना केल्या गेल्या. त्यांनाच सूक्त असे म्हणतात. सूर्यसूक्त, पवनसूक्त, जलसूक्त, नदीसूक्त, पर्जन्यसूक्त अशी कितीतरी पाठ करून म्हटली जात. यज्ञात आहुती अर्पण करून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केली जायची. कालांतराने आर्य संस्कृतीमध्ये द्रविड संस्कृतीचा संकर झाला आणि द्रविडांची मूर्तीपूजा स्वीकारली गेली. हिंदुस्थानात मूर्तीपूजा केली जाऊ लागली. गावाचे, समाजाचे रक्षण व्हावे यासाठी करावयाच्या पूजा-प्रार्थनेसाठी गावातच मंदिरे उभारून त्यात मूर्तीपूजा होऊ लागली. देवतांची प्रार्थना होऊ लागली. प्राचीन काळच्या हेमाडपंथी मंदिरातील शिल्पकला आजही लक्ष वेधून घेते. मंदिरांमुळे लोकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली.

सोळाव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम, भवानी माता आणि हनुमान यांच्याविषयी समाजात भक्ती वाढावी यासाठी अनेक ठिकाणी त्या देवतांची मंदिरे स्थापन केली. मंदिरे ही हिंदू समाजाची सांस्कृतिक केंद्रे बनली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ब्रिटिशांविरोधात चळवळ निर्माण करण्यासाठी तसेच लोकजागृतीसाठी या मंदिरांचा त्याकाळी खूप उपयोग झाला. मंदिरांमधून सातत्याने कीर्तने, प्रवचने, व्याख्याने यामधून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला. याच मंदिरांमधून सार्वजनिक उत्सव साजरे होऊ लागले. उत्सवाच्या निमित्ताने सारा गाव एकत्र येऊ लागला, मिरवणुका निघू लागल्या. लोकात उत्साह निर्माण झाला. आपापसातील मतभेद विसरून जाण्यासाठी उत्सवांचा खूप उपयोग झाला. मंदिरांमधून समाजप्रबोधन होऊ लागले.

म्हणून जायचे

> मंदिरात ध्यान केल्यामुळे तेथील सर्व शक्ती प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणाऱ्या ध्वनीकंपनामधून आपल्या मेंदूतील अंतरपटलावर या शक्तीचा परिणाम काढतो व मनावरील ताण तणाव कमी होऊ शकतो.

> मंदिरात होणारी पूजा, आरती भक्तांना त्यांचे ताणतणाव व दुःखे विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर, धूप यामुळे मंदिराचे वातावरण प्रसन्न असते. त्या सगळ्याचा फायदा आपल्यातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

> मंदिरातील तीर्थामध्ये पाणी, दूध, मध, दही, वेलची पूड, कापूर, केशर, लवंग तेल, तूप, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो. त्यामुळे मूर्तीमधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात. त्याचा शरीराला फायदाच होतो.

> या तीर्थातील गोष्टींमुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केशर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कापूर श्वासदुर्गंधीं नाहीशी करतो. तीर्थ रक्तशुद्धी करते.

आजची स्थिती

> असुरक्षितता वाढली आहे. जीवघेणी स्पर्धा आहे. कमी श्रमात, कमी वेळेत मोठे यश मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

> निर्गुण निराकार ईश्वराची उपासना सर्वांना जमत नाही. म्हणूनच सगुण साकार ईश्वराची उपासना करण्यास सुरुवात झाली.

> माणूस श्रद्धेवरच जगत असतो. देवतेची मूर्ती जेवढी भव्यदिव्य, प्रसन्न आणि सुंदर दिसते तेवढी ती मनाला भावते. मोहून टाकते.

> प्रशस्त, स्वच्छ मंदिरातील वातावरण मनाला प्रसन्न वाटते. मन आनंदित होते. माणसे क्षणभर का होईना, आपले दुःख, चिंता विसरून जातात.

> मनात पावित्र्य जपले जाते म्हणून माणसे मंदिरात जातात. मंदिर हे आपले मन मोकळे करण्याचे केंद्र बनते. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुका कबूल करून परिमार्जन करण्याची तिथे संधी असते. म्हणून माणसे मंदिरात जातात.

खरी गरज काय?

> काही मंदिरात चालत असलेला बाजार पाहून वाईट वाटते, गर्दी वाढविण्यासाठी काही ठिकाणी नवसाला पावणारा देव अशी जाहिरात उगीचच केली जाते.

> मंदिरात भक्त जे दान देतात त्याचा विनियोग योग्य व्हायला हवा. या धनातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम व्हावयास हवे. या पैशातून रुग्णालये, वाचनालये, संस्कार केंद्रे, क्रीडांगणे, वनस्पती उद्याने होणे आवश्यक आहे.

> आधुनिक काळात मंदिरे ही समाज मंदिरे, ज्ञानमंदिरे, संस्कार मंदिरे, मानवता मंदिरे, निसर्गशिक्षण मंदिरे व्हावयास हवीत. कारण ईश्वर हा निराकार निर्गुण आहे. तो चैतन्यमय आहे. तो निसर्गात आहे. तो दीनदुबळ्या माणसात आहे, माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यातच ईश्वर आहे हे लक्षात ठेवावे.

आपली प्रतिक्रिया द्या