
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच. त्यात ते नवरा बायकोचं भांडण असेल तर मग बघायलाच नको. कारण, नवरा बायकोची भांडणं चहाच्या कपातली वाटली तरी ती कधी उग्र रूप धारण करतील याचा काही नेम नसतो. असंच काहीसं अहमदाबाद इथल्या जोडप्याबाबत घडलं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद इथे राहणाऱ्या एका जोडप्यातील बायकोने नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कारण, तिच्या नवऱ्याने तिला न सांगता तिच्या खात्यातून दीड लाख रुपये काढले. महिला बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तिला कॅशियरने तिच्या खात्यात अवघे 366 रुपये उरल्याचं सांगितलं आणि महिला अवाक झाली. मग तिने तिचे बँक डीटेल्स तपासून पाहिल्यानंतर नवऱ्याने तिच्या एटीएमचा वापर करून सातत्याने पैसे काढले होते. ही रक्कम तब्बल दीड लाख रुपये इतकी होती. या प्रकाराने संतापलेल्या महिलेने नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या महिलेचा हा प्रेमविवाह आहे. या जोडप्याला एक लहान मुलगीही आहे. नवऱ्याने असं का केलं असेल, याचं उत्तर तिला मिळालेलं नाही. पोलीसही या प्रकरणाची चौकशी करत आहेत.


























































