बायकोने शेजाऱ्यासोबत लग्न केलं, नवऱ्याची फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायको शेजाऱ्यासोबत पळून गेल्याच्या दुःखात नवऱ्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केल्याची घटना बिहार येथे घडली आहे. फेसबुक लाईव्हमध्ये त्याने आपल्या मृत्युनंतर आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली होती.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार येथील अररिया येथे राहणाऱ्या हेमंत गुप्ता याच्या पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तिने हेमंतला सोडून शेजाऱ्याशी लग्न केलं. पत्नीने केलेला हा विश्वासघात हेमंत सहन करू शकला नाही. त्याने फेसबुक लाईव्ह केलं आणि बायको मुन्नी देवी व शेजारी राकेश साह यांनी कोर्ट मॅरेज केलं असून आपला विश्वासघात केल्याचं म्हटलं.

आपण हा धक्का पचवू शकत नसून विष घेऊन आत्महत्या करत आहे. आपल्याला मृत्युनंतर तरी किमान न्याय मिळावा, असं त्याने या लाईव्हमध्ये सांगितलं. हे लाईव्ह पाहणाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन करून त्याचा पत्ता दिला. पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना त्याच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दार तोडून आत पाहिलं तेव्हा हेमंत बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला.