
पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हावडा जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरात घूसून त्याच्या आजारी पत्नीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमधील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ माजली आहे.
भाजप कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोनजणांना अटक करण्यात आली आहे. इतर तिघांचा शोध सुरू असल्याचो पोलिसांनी सांगितले. महिलेचा पती आणि मुलगा घरात नसताना शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.ही अंत्यत खेदजनक घटना असून आम्ही भाजप कार्यकर्त्यासोबत आहोत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
बगनानामध्ये भाजप कार्यकर्ता पत्नी आणि मुलांसह राहतो. त्यांचा फ्लेक्स आणि बॅनर बनवण्याच्या व्यवसाय आहे. आपण शनिवारी कोलकात्याला गेलो होतो. तेथून परतता आले नाही. आपली मुलेही घरी नव्हती. आपल्या पत्नीला सहा वर्षांपूर्वी ब्रेन स्टोक आला होता. त्यात तिचा आवाज गेला असून ती ऐकू शकते. शनिवारी रात्री तिच्या नावाने आवाज दिल्याने तिने दरवाजा उघडला. त्यावेळी पाचजण घरात शिरले. त्यांनी पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. आरोपींना जाताना आपली मोटरसायकल पत्नीच्या पायावर टाकली, त्यामुळे तिला मदत मिळण्यासाठी उशीर झाला, असेही भाजप कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तृणमूलच्या स्थानिक नेत्यासह तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास सुरुवातीला पोलिसांनी नकार दिला होता. हे गंभीर प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तृणमूल हिंसाचार आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. गुन्हेगारांना जात, धर्म, पक्ष नसतो. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत, असे तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुलक रॉय यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसचे आमदार सुकांत कुमार पॉल आणि पक्षातील अन्य नेत्यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची विचारपूस केली.





























































