‘आमच्या ह्यांच्या’ वक्तव्याचा विपर्यास, मुख्यमंत्री रावत यांच्या पत्नी बचावासाठी धावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी फाटलेल्या जीन्सवरून केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आता रावत यांच्या पत्नी त्यांच्या बचावासाठी धावल्या असून रावत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्नीची सारवासारव

तिरथ सिंह रावत यांच्या पत्नी रश्मी रावत या मिस मेरठ होत्या. रश्मी रावत म्हणाल्या की, “मुख्यमंत्री रावत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. त्यांचे वक्तव्य पूर्ण न दाखवता चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे.” तिरथसिंह रावत म्हणाले होते की, समाज आणि देशाच्या निर्मितीत महिलांचा मोठा सहभाग आहे. देशाची संस्कृती, ओळख आणि वेषभूषा वाचवण्याची जवाबदारी महिलांच्या खांद्यावर आहे असे रावत यांना म्हणायचे होते असं रश्मी रावत यांचं म्हणणं आहे.

कसले संस्कार करणार?

उत्तराखंडमधील बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री तिरथसिंह यांनी महिलांच्या पाश्चिमात्य वेशभूषेवर नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, “मुलांवर होणाऱ्या संस्काराला आईवडीलच जबाबदार असतात. मग प्रवासात मुलाला घेऊन फिरणारी महिला जर फाटकी जीन्स घालून प्रवास करीत असेल तर ती मुलांवर कसले संस्कार करणार, हा माझा सवाल आहे.”

खासदार महुआ मोईत्रा यांची टीका

त्यांच्या या वक्तव्यामुळे देशात वाद निर्माण झाला होता. त्यावर तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली होती. मोईत्रा यांनी ट्विट करून म्हटले होते की, “उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात की खाली पाहिलं तेव्हा पायात गमबूट होते आणि वर पाहिलं तेव्हा….एनजीओ चालवते आणि फाटलेले गुडघे दिसतात? मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पाहिलं तेव्हा वरून-खालून, पाठून-पुढून आम्हाला फक्त बेशरम आणि वाह्यात माणूस दिसतो. राज्य चालवता आणि मेंदू फाटलेलं दिसतं?”

#RippedJeansTwitter हे हॅशटॅग दिवसभर ट्रेंड

महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत चांगलेच अडचणीत आले आहेत. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. #RippedJeansTwitter हे हॅशटॅग दिवसभर ट्रेंडिंगवर होते. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक महिलांनी फाटक्या (रिप्ड) जीन्ससोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून ‘‘जीन्स नाही, तर रावतांचा मेंदू फाटकाय’’ अशा आशयाच्या कमेंटस् केल्या आहेत.

फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ‘‘रिप्ड जीन्स आणि पुस्तकं, देशातील संस्कृती आणि संस्कारांना अशा पुरुषांपासून धोका आहे. विचार बदला मुख्यमंत्री रावतजी, तेव्हाच देश बदलेल.’’ तर ‘‘महोदय, फाटलेल्या जिन्सला देशातील युवावर्ग सांभाळेल, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय?’’ असा सवाल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.