
सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी
गव्हाच्या पिकाला पाणी देत असताना बुधवारी दुपारी 4 वाजता जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकरी विनायक आप्पासाहेब बोबडे यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. रानडुकराच्या हल्यात जखमी झालेले शेतकरी विनायक बोबडे यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बाजार समितीचे संचालक शिवाजीराव बोबडे यांनी केली आहे. विहिरीत असलेल्या जेमतेम पाण्यावर काही शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली आहे. पीक जगविण्यासाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीचा सामना शेतकरी करत असताना रानातील हरीण, ससे, रानडुक्कर पिकांची नासाडी करत आहेत. पिकाची नासाडी करून शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचे वन्य प्राण्यांचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




























































