हल्ल्याचा खतरनाक बदला घेऊ, इराणची अमेरिकेला धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला करत ईराणच्या कुद्रस फोर्सचा टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी याच्यासह सात जणांचा खात्मा केला. यामुळे चवताळलेल्या ईराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देत याचा खतरनाक बदला घेतला जाईल असा धमकीवजा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या या हल्ल्यात सुलेमानसह इराकी मिलिशिया कमांडर अबु महदी अल मुहंदिसही ठार झाला आहे. अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार इराकच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या हल्ल्यात अतिमहत्वाच्या पाहुण्यांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती इराकच्या पीएमएफने दिली आहे.

तसेच या हल्ल्याच्या वृत्तास अमेरिकेनेही दुजोरा दिला आहे. पेंटागॉनने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागर्दशनानंतरच हा हल्ला करण्यात आला आहे. परदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा हल्ला करण्यात आल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे.

तर ईराणचे परदेश मंत्री जावेद जाफरी – यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या अमेरिकेचे हे पाऊल भयानक असून मूर्खपणाचे आहे. असे म्हटले आहे.