
काळी जादू, नरबळी या सारख्या अंधश्रध्दांनी ग्रामीण भागातील अनेकांना आजही ग्रासलेले आहे. यापैकी काही घटना जगासमोर येतात तर, काही घटना कोणाला कळतही नाहीत. अंधश्रद्धेतून एका वृद्ध दाम्पत्याचा खून करण्यात आला आहे. या दाम्पत्यासोबत त्यांच्या 10 वर्षांच्या नातीचाही खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. काळी जादू करत असल्याच्या संशयावरुन हे हत्याकांड करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील गुंडापुरी गावात 6 डिसेंबर, रोजी काळी जादू करत असल्याचा संशयावरुन देवू कुमोती (60) यांचा हातोड्याने वार करुन खून करण्यात आला. त्यांची पत्नी बिच्छे (55) हिचा धारधार शस्त्राने गळा चिरुन खून केला. आजोबा आजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्यांची नात अर्चना तलांडी (10) आरडाओरडा करायला लागली त्यामुळे तिचाही आरोपींनी निर्घृण खून केला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवू, बिच्छे आणि अर्चनाचा खून करणाऱ्या आरोपींमध्ये देवूच्या दोन मुलांचाही समावेश आहे. एकूण 9 जणांनी मिळून हे हत्याकांड केलं, ज्यात रमेश आणि विनू या देवूच्या दोन मुलांचाही समावेश आहे. इतर सात आरोपी हे देवूच्या नात्यातलेच आहेत.
देवू हे गावठी पद्धतीने उपचार करत होते. त्यांच्याकडून उपचार घेणाऱ्या काहींना गुण येण्याऐवजी त्रास व्हायला लागला होता. दूवे हा काळी जादू करत असल्याने आपल्याला हा त्रास होत असल्याचा या लोकांच्या मनात संशय निर्माण झाला होता. देवूकडून उपचार करून घेणाऱ्या काहींचा मृत्यू झाल्यानंतर देवूविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. देवू आणि त्याच्या बायकोला काळी जादू करत असल्याच्या आरोपावरून बहिष्कृत करण्यात आले. आपले वडील हे खरोखकर काळी जादू करतात आणि त्यामुळे आपल्यालाही अपमानाचे जीवन जगावे लागत असल्याची भावना देवूची मुलं रमेश आणि विनू यांच्या मनात निर्माण झाली होती, यामुळे रमेश आणि विनू यांनी नातेवाईकांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले.

























































