गोळ्यांच्या आवाजाने खडबडून जागा झालो; सलमान खानची पोलिसांना माहिती

बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं मुंबई पोलिसांना सांगितलं की, 14 एप्रिलच्या पहाटे गोळ्यांच्या आवाजानं तो खडबडून जागा झाला, त्याच्या आदल्या रात्री तो पार्टी करून उशिरा झोपला होता.

बुधवारी एका अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, एप्रिलमध्ये सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खान आणि त्याचा अभिनेता भाऊ अरबाज खान यांचे जबाब नोंदवले आहेत.

चार सदस्यीय गुन्हे शाखेच्या पथकाने 4 जून रोजी सलमान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटला भेट दिली.

सलमानचा जबाब नोंदवण्याचे काम सुमारे चार तास सुरू होते, तर त्याच्या भावाचा जबाब नोंदवण्यास दोन तासांहून अधिक काळ लागला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

14 एप्रिलच्या पहाटे दोन मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर अनेक राऊंड गोळीबार केला.

त्यासंदर्भात जबाब नोंदवताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सलमान आणि अरबाजला सुमारे 150 प्रश्न विचारले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या यापूर्वीही सलमान खानला धमक्या आल्या होत्या, परंतु आतापर्यंत सलमानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेले कथित शूटर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना त्यानंतर गुजरातमधून अटक करण्यात आली.

याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक अनुज थापन याने 1 मे रोजी पोलीस लॉकअपमध्ये गळफास लावून घेतला होता.