लोकलमध्ये झाली महिलेची प्रसूती, रेल्वे पोलिसांच्या मदतीला आल्या महिला प्रवासी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पहाटे पावणेपाचची वेळ… दहिसर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 2… महिलेला अचानक सुरू झालेल्या प्रसूतीच्या कळा… डय़ुटीवर असलेल्या पोलिसांनी दोन महिला प्रवाशांची घेतलेली मदत… महिलेने लोकलमध्ये मुलीला जन्म दिला… त्या दोघी मायलेकींना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींचीही प्रकृती स्थिर आहे.

नालासोपारा येथे बबिता यादव ही राहते. आज पहाटे तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. ती दिरासोबत बोरिवली येथे रुग्णालयात येत होती. दहिसर स्थानकात येणाऱ्या लोकलच्या अपंगांच्या डब्यात असलेल्या महिलेला मदत हवी, असा रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. तेव्हा बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुनील पवार, पोलीस शिपाई चिकणे हे डय़ुटीला होते. लोकल पहाटे पावणेपाच वाजता दहिसर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक-2ला आली. लोकल आल्यावर पवार आणि चिकणे हे अपंगांच्या डब्यात गेले. पवार यांनी सोबत चादर नेली. पवार यांनी दोन महिला प्रवाशांची मदत घेतली. चादरीने बबिताला कव्हर केले. बबिताने मुलीला जन्म दिला. त्या मायलेकींना रुग्णालयात कसे न्यायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला. तेव्हा पवार यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका बोरिवली स्थानकात तयार ठेवण्यास सांगितली. लोकल बोरिवलीच्या दिशेने आली. पवार, चिकणे, होमगार्ड राजे, इंगोले यांनी बबिता आणि तिच्या मुलीला चादरीत गुंडाळले. त्या दोघींना रुग्णवाहिकेतून कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी बबिता आणि तिच्या मुलीची तपासणी केली. बोरिवली रेल्वे पोलिसांच्या या कामाचे कौतुक होत आहे.