कुंभमेळय़ात हरवली, पाच वर्षांनी सापडली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुंभमेळ्यात हरवण्याचा आणि बऱ्याच वर्षांनी कुटुंबियांशी भेट होण्याचा प्रसंग बॉलीवूडच्या अनेक जुन्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो. चित्रपटातली ही घटना आता प्रत्यक्षात घडली आहे. 2016 साली हरिद्वार येथे झालेल्या अर्धकुंभमेळ्यात हरवलेल्या महिलेची तब्बल पाच वर्षांनी आपल्या कुटुंबियांशी भेट झाली आहे.

कृष्णा देवी असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या पाच वर्षांपूर्वी मथुरा, वृंदावन, अयोध्या, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ अशी यात्रा करून हरिद्वारला अर्धकुंभेळ्यात जाणार होत्या. दुर्दैवाने त्यानंतर त्या घरी पोहचल्या नाहीत. कृष्णा देवी यांचा कुटुंबियांनी बराच शोध घेतला, पण त्या सापडल्या नाहीत. सिद्धार्थनगर जिह्यातील जोगिया उदयपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती.

कृष्णा देवी यांच्या कुटुंबियांनी जवळपास आशा सोडून दिली होती. अचानक एके दिवशी त्यांना आनंदाची बातमी समजली. सध्या हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. त्यावेळी उत्तराखंड पोलिसांच्या पथकाला ऋषिकेशच्या त्रिवेणी घाटावर कृष्णा देवी सापडल्या. त्या गेल्या पाच वर्षांपासून तिथेच राहात होत्या.

कृष्णा देवी यांनी पोलिसांना आपल्या गावाचं नाव आणि पत्ता सांगितला. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. कृष्णा देवी यांची भेट झाल्यावर कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही.