
संक्रांतीच्या गडबडीत बचत गटाची मीटिंग आणि देवदर्शनही करायचे असल्याची थाप मारून पिंपरी-चिंचवडमध्ये नेले आणि धमकावून घड्याळाला मतदान करायला लावले. यात आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील बचत गटाच्या महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
शेतमजूर असणाऱ्या बचत गटाच्या महिलांना देवदर्शनासाठी जायचे आहे म्हणून गाडीत बसवले. तसेच दुसऱया दिवशी म्हणजे 15 तारखेला पुण्यात बैठक आहे. त्या बैठकीलाही जायचे आहे, असे सांगण्यात आले. सावरगावातून थेट जेजुरीला नेले. जेजुरीत एक दिवस आधी मुक्कामाला ठेवले. मात्र तेथे गर्दी असल्याने देवदर्शन झालेच नाही. दुसऱया दिवशी भल्या पहाटे या महिलांना पिंपरी-चिंचवडमध्ये नेण्यात आले आणि धमकावून आणि दबाव टाकून घडय़ाळाला मतदान करायला लावले. मतदान झाल्यानंतर याच गाडीतून थेट गावाकडे आणून सोडले.































































