
जिद्द असेल तर माणूस पर्वतालाही हटवू शकतो असे बोलते जाते. धडधाकट माणूस एकवेळ हे करूनही दाखवेल. परंतु जन्मापासून अपंग आणि अंध असणाऱ्या व्यक्तींनीही आपल्यातील कमकुवतपणावर विजय मिळवून पर्वताला पायाखाली तुडवले आहे. मेलानी क्नेच आणि ट्रेवर हॅन या दिव्यागांना शारिरीक व्यंगाला बाजूला सारून गिर्यारोहणाचा छंद जपला आहे.
29 वर्षीय मेलानी हिला जन्मापासून spina bifida (स्पाइन बिफिडा) हा आजार आहे. यामुळे ती जन्मापासून चालू शकत नाही. तर 42 वर्षीय ट्रेवरला 5 वर्षापूर्वी ग्लूकोमा (काळा मोतीबिंदू) झाला होता आणि त्याच्या डोळ्याला दिसणे हळूहळू कमी झाले. या स्थितीतही दोघांनी एकमेकांची मदत घेत ट्रेकिंग सुरू केली. दोघेही अमेरिकेतील कोलोरोडो येथे राहतात आणि उंच पर्वतांवर चढाई करतात.

मेलानी आधी व्हिलचेअरचा उपयोग करत होती. कधीकाळी आपण पर्वतावरही चढू शकू असे तिला वाटलेही नव्हते. परंतु ट्रेवर हॅन याने तिला पाठीवर घेऊन सर्वात आधी इस्टर आयलँडवची सफर घडवली. यानंतर हे दोघे चांगलेच मित्र बनले. दोघांनाही निसर्गाची ओढ असून ट्रेकिंगसाठी ते उंच उंच पर्वतं पायदळी तुडवत आहेत.

आपल्या या प्रवासाबाबत बोलताना मेलानी म्हणाली की, माझ्याजवळ पाय नाही, परंतु ट्रेवरच माझे पाय आहे. ट्रेवरकडे डोळे नाही, तर मी त्याची डोळे बनली आहे. दोघेही आम्ही एकत्रित निसर्गाचा आनंद लुटतो, गिर्यारोहणाला जातो. आम्ही खूप आनंदी आहोत. या दोघांना जवळचे मित्र ‘हायकिंग बडीज’ या नावाने ओळखतात.





























































