
देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी आता महिला सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून या महिला कमांडोंच्या खांद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासह दिल्लीतील अन्य व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने त्यांचे पहिलेवहिले महिला गार्ड सुरक्षा दल तयार केले असून त्यात 32 महिला कमांडोंचा समावेश आहे. या महिला कमांडोची नियुक्ती झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षा दलात करण्यात आली आहे.
सीआरपीएफच्या या महिला कमांडोंनी दहा आठवडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि नवीन वर्षात त्यांना दिल्लीतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत तैनात केले जाणार आहे. यात अमित शहा, सोनिया गांधी यांच्याबरोबरच राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, त्यांच्या पत्नी गुरुशरण याशिवाय अन्य अनेक नेत्यांचा समावेश आहे. व्हीआयपींच्या सुरक्षेचा बंदोबस्त ठेवणे, हत्यारांशिवाय मुकाबला करणे, शारीरिक तपासणी घेणे त्याचबरोबर फायरिंगचे विशेष प्रशिक्षण त्यांना दिले आहे. व्हीआयपींचा अन्य भागातील दौर, आगामी निवडणुकीच्या बंदोबस्तातही या महिला कमांडोना तैनात केले जाणार आहे.

























































