हिंदुस्थानच्या लेकी अखेरपर्यंत झुंजल्या, पण…!

बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांची क्रिकेट फायनल अतिशय रोमहर्षक झाली. बलाढय़ ऑस्ट्रेलियन संघाच्या तोंडचे पाणी हिंदुस्थानी संघाची कर्णधार हरमनप्रीत (43 चेंडूंत 65 ) आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (33 चेंडूंत 33 ) या जोडीने काही काळ पळवले होते, पण अन्य मोठय़ा स्पर्धांप्रमाणेच याही अंतिम लढतीत शेवटच्या क्षणी हिंदुस्थानी महिला ढेपाळल्या आणि व्यावसायिक खेळ करणाऱया ऑस्ट्रेलियन महिला संघाने हिंदुस्थानच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेत केवळ 9 धावांचा चुरशीचा विजय मिळवला. या विजयाने ऑस्ट्रेलियाला सुवर्ण पदक तर उपविजेत्या हिंदुस्थानी महिला संघास रौप्य पदक मिळाले. मात्र बलाढय़ कांगारूंना दिलेली हिंदुस्थानी लेकाRची झुंज हा स्पर्धेतील प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरला. 2017च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतही हिंदुस्थानी महिला संघाने इंग्लंडविरुद्ध  जिंकता जिंकता  जेतेपदाची लढत गमावली होती. गेल्या 5 वर्षांत हिंदुस्थानी महिला संघाने तीनदा मोठय़ा स्पर्धांचे जेतेपद हातचे गमावले आहे.

बार्ंमगहॅम राष्ट्रकुल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानी महिलांसमोर विजयासाठी 20 षटकांत 162 धावा करायचे आव्हान होते. हिंदुस्थानची स्टार ओपनिंग जोडी स्मृती मंधाना (7 चेंडूंत 6 ) आणि धडाकेबाज शेफाली वर्मा ( 7 चेंडूंत 11 ) या फ्लॉप ठरल्याने हिंदुस्थानपुढचे आव्हान अधिक खडतर झाले होते, पण कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्ज जोडी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी मोठी समस्या ठरली होती. या जोडीने तुफानी खेळ करीत काही काळ कांगारूंच्या तोंडचे पाणी पार पळवले होते, पण अखेर परंपरेनुसार अखेरच्या षटकांतील चुकांमुळे ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा वरचढ झाला.