
पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
महिलांविषयक तक्रारींसंदर्भात विधान भवनातून व्हीसीद्वारे बैठक पार पडली. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक राजवर्धन, संबधित जिह्यांचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते. महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाइन स्वरूपात घ्यावात. बालविवाह, पोटगी, सोशल मीडियामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक, ऊसतोड कामगार जेव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे, त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तत्काळ निराकरण करावे. मुलींना फूस लावून पळवणे, जात पंचायतींकडून होणारा छळ या आणि इतर बाबतीत महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ.नीलम गोऱहे यांनी केल्या.





























































