
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची जीवघेणी कसरत आता लवकरच थांबणार आहे. पर्यटकांना किल्ल्यात सहज प्रवेश करता यावा यासाठी मेरिटाईम बोर्डाने हाती घेतलेले ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. ब्रेक वॉटर बंधारा आणि जेट्टीदरम्यान अॅल्युमिनियम धातूचा 40 मीटर लांबीचा पूल तयार करण्याचे काम लवकरच संपणार आहे. या पुलाचा सांगाडा तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत त्याची ब्रेक वॉटर बंधारा आणि जेट्टीच्या दरम्यान फिटिंग केली जाणार आहे.
जंजिरा किल्ला हा पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना राजपुरी व खोरा बंदरातील जेट्टीवरून बोटीने जावे लागते. मार्चनंतर समुद्र खवळण्यास सुरुवात झाली की, पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर बोटीतून उतरताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा लहान मुले, पर्यटकांना उचलून किल्ल्याच्या पायरीवर ठेवावे लागते. हे सर्व असुरक्षित असल्याने सरकारने जंजिरा किल्ल्यात नवीन प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला होता.
प्रवासी जेट्टीसाठी 93 कोटी रुपये खर्चाचे काम 2023 मध्ये सुरू झाले. ही जेट्टी किल्ल्याच्या मागच्या बाजूस आहे. या बाजूला महाकाय लाटा उसळत असतात. या लाटांचा त्रास कमी होण्यासाठी ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला. मे 2024 मध्ये ब्रेक वॉटर बंधारा पूर्ण झाला असला तरी जेट्टीचे काम मात्र लांबणीवर पडले होते. यावर नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती. आता ही सर्वच रखडलेली कामे येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहेत. जेट्टीच्या पुढील कामासाठी लागणारे प्लिंथ कॅप आगरदांडा परिसरात बनवण्यात आले आहेत. 150 मीटर ब्रेक वॉटर बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा अडवल्या जाणार असून पर्यटकांना सहज जेट्टीवर उतरून किल्ला पाहता येणार आहे.
क्रेनच्या सहाय्याने पूल बसवणार
ब्रेक वॉटर बंधारा आणि जंजिरा किल्ल्याची जेट्टी यांच्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या 40 मीटर लांबीच्या अॅल्युमिनियमच्या पुलाचा सांगाडा तयार करण्यात आला आहे. हा पूल क्रेनच्या सहाय्याने आणून बंधारा आणि जेट्टीच्या दरम्यान बसवला जाणार आहे. पावसाळ्यात किल्ल्यात जाण्यास बंदी लागू होणार असल्याने थेट दिवाळीपूर्वी या पुलाचा वापर करून पर्यटकांना किल्ला पाहता येणार आहे. किल्ल्यात जाण्यासाठी प्रवास सुरक्षित होईल, अशी प्रतिक्रिया मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरा यांनी व्यक्त केली आहे.