जगाच्या पाठीवर – जगातील पहिले हेलिकॉप्टर

अजूनही प्रत्येकाला हवेतून उडणाऱया विमानांबद्दल, हेलिकॉप्टर्सबद्दल आकर्षण आहे. हवेतून विमान, हेलिकॉप्टर्स उडताना पाहिलं की, प्रत्येकाची नजर अजूनही आकाशाकडे वळते. जगातील पहिलं विमान जसं राईट बंधूंनी बनवलं, तसं जगातील पहिलं हेलिकॉप्टरही फ्रान्स देशातील दोन भावांनी मिळून बनवलं. जेक्स आणि लुईस ब्रेगर ही त्यांची नावे. 1907 मध्ये त्यांनी हे हेलिकॉप्टर बनवलं.

अशा पद्धतीचे हवेतून उडणारे वाहन बनविण्याचे प्रयत्न चीनमध्ये झाले होते. तशी चित्रे जुन्या पेंटिंगमध्ये सापडतात. 1480 मध्ये जगप्रसिद्ध चित्रकार ज्याने मोनालिसाचे पेंटिंग काढले, त्या चित्रकार लिआनार्दो विंची याने अशी हवेत उडणाऱया वाहनांची चित्रे काढलेली आहेत. त्याला त्याने ‘एरियल स्क्रू’ हे नाव दिले आहे. जुलै 1754 मध्ये रशियातील मिखाईल लोमोनोसोव्ह यांनीही असा हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने बल्बचा शोध लावला हे आपल्याला माहीत आहे, पण त्याने अनेक शोध लावले आहेत. मोठमोठे उद्योजक त्याला अमुक बनव, तमुक बनव असेही सांगत असत. त्याप्रमाणे जेम्स गॉर्डन बेनेट यांनी 1885 मध्ये एडिसनला त्या वेळी हेलिकॉप्टर बनविण्यासाठी प्रचंड रक्कम दिली होती.

हेलिकॉप्टर आणि विमानात हा फरक आहे की, विमान उडण्यासाठी धावपट्टी लागते तर हेलिकॉप्टर हवेत सरळ उंच उडू शकते.