जागतिक जलदिनी किसान कनेक्टच्या शेतकऱ्यांनी घेतली पाणी संवर्धनाची व बचतीची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kisan-konnect

जागतिक जलदिनी किसानकनेक्ट या शेतकरी संचलित ऑनलाईन पद्धतीने शेतातून थेट दारी भाजीपाला व फळे पुरविणाऱ्या मंचाच्या शेतकऱ्यांनी पाणी बचाव व संवर्धन करण्याची शपथ घेतली. त्याचबरोबर, भाजीपाला व फळे शेतात पिकविताना पर्यावरण पूरक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचीही प्रतिज्ञा केली. येणाऱ्या काळात पाणी वापरासंबंधी अभिनव पद्धतींचा व प्रक्रियांचा वापर करण्याचाही त्यांनी संकल्प सोडला. पाण्याच्या सुयोग्य वापराने फक्त संवर्धनच नाही तर भाजी व फळांच्या उत्पादन व प्रती मध्येही नैसर्गिकरित्या उच्च गुणवत्ता सातत्यपूर्ण देण्याचा आशावादही व्यक्त केला.

प्रागतिक शेतकरी या नात्याने हवामान बदलाचा वेध घेत त्याप्रमाणे आपल्या पीक मशागत पद्धती व पर्यावरणयोग्य शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणाऱ्या किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांनी शेतात पाणी बचत व संवर्धनासाठी स्वतःच पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. या बाबतीत बोलताना किसानकनेक्टचे एक संस्थापक शेतकरी सदस्य राजेंद्र लबडे म्हणाले की, “आम्ही सर्व शेतकरी आज जलदिनी पाणी संवर्धनातून पर्यावरण पूरक शेतीची शपथ घेतो आहोत. यांत शेतात पाणी वापरण्याच्या व मृद्संधारण पद्धतींचा विचार करून अन्य तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शेतकरी सभासदांना प्रेरित केले जाईल. यासाठी आम्ही जल व मृद् तज्ज्ञ आणि श्रीरामपूर जवळील राहाता येथील कृषी विज्ञान केंद्राची मदत घेत आहोत. याचा आमच्या ऑनलाईन बाजारपेठेला हरित उद्योग करण्याच्या कामी उपयोग होईल. “

किसान कनेक्टचे अधिकांश शेतकरी नगर जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यात सरासरी 621 मिमि पाऊस पडतो व तोही वर्षातील सरासरी 46 दिवस. “शेतकऱ्यांना उपलब्ध पावसातून निर्माण होणारा जलसाठा वर्षभराच्या शेतीसाठी नियोजनबद्ध रितीने वापरावा लागतो. त्यामुळे, आमच्यासाठी पाण्याचे संवर्धन गरजेचे व परिणामकारकही आहे. पाण्याच्या नियोजनाच्यादृष्टीने आम्ही अनेक पद्धतींचा तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करीत आहोत”, असे अन्य सदस्य श्रीकांत ढोकचवळे म्हणाले.

किसान कनेक्टच्या शेतकऱ्यांनी पाणी, माती व ओलाव्याच्या अधिक परिणामकारक वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ठिबक सिंचनाबरोबरच शेतात पाणीसाठे व शेततळी निर्माण करणे, शेतांच्या बांधांवर छोटे जलमार्ग तयार करणे, ओहोळ तयार करणे, पाणी जिरवणे, तिरप्या पद्धतींची पीकपेरणी, इत्यादी मार्गांचा अवलंब केला जाणार आहे. पेरणी, नांगरणी व मशागतीसाठी पाणी वापराबरोबरच वातावरणातील ओलाव्याच्य वापर करणे, दगडांचे छोटे बांध करून पाणी अडविणे तसेच शेतांची लहान लहान भागांत विभागणी करून मृद्संधारण करणे या गोष्टींचा अवलंब करण्याचे ठरविले आहे.