लेखणीतून उमटलेले मोत्यांचे संस्कार

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

लेखक, कवी एकनाथ आव्हाड मुंबई महानगरपालिकेच्या शाळेने त्यांच्यातील लेखकाला लिहितं केलं…. तर साहित्याचे संस्कार झाले घरातील लाकडी पोटमाळ्यावर.

लेखक होईन असं वाटलंच नव्हतं कधी. हं, एक मात्र होतं की, लहानपणी खाऊचे पैसे वाचवून पुस्तकं घ्यायचो. ‘जादूचा शंख’सारख्या परिकथा खूप आवडायच्या मला. वाचनाचा नाद इतका की, मिठाच्या पुडीचा कागदसुद्धा फेकण्याआधी वाचायचो. मित्र कमी होते मला. पुस्तकंच मित्र वाटायची. आई महानुभाव पंथातली. वडील वारकरी पंथातले. वडील कीर्तनाला घेऊन जायचे. आई खूप छान, रसाळ, प्रासादिक बोलायची. अशिक्षित होती ती, पण बोलता बोलता दाखले, उदाहरणं  छान द्यायची… कथाकथनाचे पाचशेहून जास्त जाहीर प्रयोग पूर्ण करणाऱया एकनाथ आव्हाड यांच्या कथाकथन शैलीवर या सगळ्याचा कसा संस्कार झाला असेल हे तत्काळ लक्षात आलं माझ्या.

‘बालपण ऐषोआरामात नाही, पण खाऊन पिऊन सुखी गेलं माझं. आईवडील भाजी विकायचे. फळं, भाज्या भरपूर यायच्या घरात. त्यामुळे खाण्याची आबाळ झाली नाही कधी. मीही भाजी विकायला मदत करायचो. टोपली घेऊन जायचो. तिथेही पुस्तक असायचंच. जुन्या पद्धतीचा लाकडी माळा होता घरात. तेच माझं विश्व. तिथे रात्र-रात्र वाचायचो. वडील ओरडायचे. मग मी त्या लाकडी माळ्याचं झाकण लावून घ्यायचो, वर कोणी येऊ नये म्हणून. मग काय, माझंच साम्राज्य! आई म्हणायची, ‘‘वाचू दे त्याला. त्याच्या वाटणीचं काम मी करीन.’’

भाजी विकून घर चालवणाऱया त्या माऊलीमुळेच एकनाथ आव्हाड भरपूर वाचू शकले. हाच मुलगा मोठेपणी गावोगावी कथाकथनासाठी जायला लागला. लहानग्यांना मनोरंजनाबरोबरच ज्ञानाचा घास सहजतेनं भरवायला लागला. आडवं पुंकू लावलेली, चांदीचे गोठ हातात घातलेली, साडीचोळी नेसलेली एक ग्रामीण स्त्री पहिल्या रांगेत बसून हे सगळं बघायची. ऐकायची आणि ती दुसरी तिसरी पुणीही नसायची, तर एकनाथ आव्हाडांची आई असायची. काय वाटत असेल नाही तिला तेव्हा… आईनं वाचनाचं वेड लावलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळेनं त्यांना लिहितं केलं. वाचताना तुम्ही कदाचित अडखळला असाल.  मुंबई महानगरपालिकेच्या शाळेनं  लेखक  घडवला? लिहिताना काही चूक तर नाही नं झाली? असे प्रश्नामागून प्रश्न उभे राहिले असतील तुमच्या मनात, पण सांगायला अतिशय आनंद वाटतोय की, तुम्ही जे वाचलं ते बरोबरच आहे. एकनाथ आव्हाडांना महानगरपालिकेच्या शाळेत शिकवताना तिथल्या मुलांमुळेच लेखनाचा सूर गवसला. ‘‘मी माझ्या शाळेचा मनापासून आभारी आहे. मी आज जो आहे तो तसा झालोच नसतो, जर मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकवत नसतो.’’  एकनाथ आव्हाड जेव्हा असं सांगायला लागले, तेव्हा अर्थातच आश्चर्य आणि उत्सुकता शिगेला पोहोचली होती माझी.

‘‘माझ्या वर्गातल्या मुलीवर मी पहिली कविता केली. सविता पटेकर तिचं नाव. ती सतत गैरहजर असायची. ती गैरहजर का असते याचा शोध घ्यायला मुख्याध्यापिका सुहासिनी पार्टे यांनी मला सांगितलं. घरी आई आणि सविता दोघीच राहत होत्या. आई कचरा वेचायची, धुणीभांडी करायची. तिची नजर चुकवून सविता शाळा बुडवायची. तुमच्यासारखं आयुष्य मुलीच्या वाटय़ाला येऊ नये असे वाटत असेल तर तिला शाळेत पाठवा असं मी तिच्या आईला म्हणालो. तिच्या आईनं तिला ओढत ओढत शाळेत आणलं आणि माझी पहिली कविता जन्माला आली. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, कापुळतीला येऊन म्हणाली, ‘‘यापुढे नाही राहणार घरी, मास्तर वर्गात घ्या हिला ठेवून. मुलीचं नाव, सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर.’’ एकनाथ आव्हाडांकडून ही कवितेची जन्म कहाणी ऐकताना मला सर्वात जास्त आनंद कशाचा होत होता माहीत आहे? विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचं मूळ शोधून काढावं आणि ते समूळ नष्ट करून त्या विद्यार्थ्याला शाळेत आणावं असं वाटणारे, नुसतं वाटणारे नाही, तर ते वाटणं प्रत्यक्ष पृतीत आणणारे शिक्षक, मुख्याध्यापक आजही अस्तित्वात आहेत याचा. लाखांच्या घरात फी आकारणाऱया नाही, तर महानगरपालिकेच्या शाळेतले हे शिक्षक आहेत याचा आनंद. अवाढव्य फी म्हणजे उत्पृष्ट शिक्षण असा अर्थकारणाशी संबंधित अर्थ निरर्थक आहे हे माझं म्हणणं या उदाहरणानं सप्रमाण सिद्ध झालं याचा आनंद. तत्त्वनिष्ठता, मूल्य संस्कार आणि माणूस घडवणारे हाडाचे शिक्षक आजच्या युगातही अस्तित्वात आहेत याचा आनंद. ‘बोधाई’, ‘अक्षरांची फुले’, ‘आभाळाचा फळा’ असे नऊ बाल कवितासंग्रह, बालकोश खंड १ ते ५, आकाशवाणीसाठी अनेक बालगीतं असं विपुल साहित्य एकनाथ आव्हाडांकडून  निर्माण झालं.

त्यांच्या पहिल्या पुस्तकासाठी प्रस्तावना मागायला जेव्हा ते  विजयाताई वाडांकडे गेले, तेव्हा त्या मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा असल्यानं त्यांच्याकडे कामाचा व्याप खूप होता. आपल्याकडून प्रस्तावना द्यायला कदाचित उशीर होईल. त्यापेक्षा आपल्याहून चांगल्या व्यक्तीकडून प्रस्तावना घेऊन देते असंही त्यांनी आव्हाडांना सांगितलं, पण ‘‘मला पुस्तक प्रकाशनाची घाई नाही.  प्रस्तावना द्या, मी थांबतो’’ असं  आव्हाड म्हणाले आणि आनंदाची गोष्ट अशी की, विजयाताईंनी त्या सगळ्या कविता एका रात्रीत वाचून त्यांना प्रस्तावना ताबडतोब पाठवून दिली.  एक चांगलं पुस्तक बालवाचकांपासून जास्त काळ दूर राहू नये, केवळ म्हणून एकनाथ आव्हाड त्यानंतरची घटना सांगताना भावुक होणं स्वाभाविकच होतं. ‘‘मी प्रकाशन सोहळा वगैरे केलाच नाही त्या पुस्तकाचा. मी विजया मावशींच्या घरी गेलो. त्यांना पहिली प्रत दिली. तोच माझ्यासाठी सोहळा होता. त्यावेळी त्यांनी मला शाल पांघरली आणि म्हणाल्या, ‘तू सरस्वतीच्या दालनात पाऊल टाकलं आहेस.’ आई नसल्याची आठवण आली तेव्हा आणि त्या म्हणाल्या, ‘मला मावशी म्हण ना.’ कवितांनी नात्याची अशी नाळ जोडली गेली.’’

‘अक्षरधन’ मासिकात गिरिजा कीर यांनी एकनाथ आव्हाडांची पाच-सहा पानी मुलाखत घेतली आणि त्यांच्या लिखाणाला दाद दिली. हे जसं एकनाथ आव्हाड यांनी आवर्जून सांगितलं तसंच गडचिरोलीच्या चौथीतल्या मुलानं त्यांची कविता वाचून ‘‘तुम्हाला मी काय देऊ? माझ्याजवळ काहीच नाही. माझ्या वहीतलं खूप जपून ठेवलेलं मोराचं पीसच तुम्हाला पाठवतो’’ असं म्हणत त्यांना ते मोराचं पीस पाठवलं होतं हेही त्यांनी गहिवरून सांगितलं. मुलांच्या आयुष्यात आनंदाची बाग फुलवता फुलवता त्यांच्याही आयुष्यात आनंदाची बाग फुलली हेच वारंवार त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यांच्या बोलण्या-वागण्यातला साधेपणा, छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये त्यांना वाटणारा आनंद या सगळ्याचं गमक त्यांच्या या निरागस बालविश्वात आहे. मराठीची दुर्दशा, मराठीचा ऱहास याबद्दल वांझोटी चिंता करत बसणाऱयांना एकनाथ आव्हाडांसारखे बालसाहित्यिक पृतिशील आणि प्रयोगक्षम लिखाणातून उत्तर देत असलेले मी पाहिले, ऐकले, वाचले आणि प्रचंड वादळवाऱयातही शांतपणे तेवत असणाऱया समईच्या प्रकाशाची ज्योत माझ्याही मनाला प्रकाश देत अस्वस्थतेवर शांततेची शाल पांघरून गेली.

 

आपली प्रतिक्रिया द्या