लेखकाच्या घरात…घरच्या गाभाऱयात उजळलेली लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

मंगला गोडबोले, मध्यमवर्गीय ब्राह्मणी वळणाचे संस्कार सार्थ अभिमानाने मिरवत त्यांची लेखणी अखंड प्रकाशते आहे…

मी अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातली मुलगी. ब्राह्मणी शब्द मुद्दाम वापरला मी. कारण सध्या हा शब्द वापरताना लपवाछपवी करतात लोक. मला ती करावीशी वाटत नाही.’ घर हा समाजाचा सारांश असतो आणि प्रत्येक यशस्वी माणसाच्या मनाच्या कोपऱयात एक संपन्न घर आपल्यामागे आहे ही भावना असते, असं मानणाऱया मंगलाताई गोडबोले यांच्याशी बोलत होते तेव्हा प्रकर्षानं जाणवत होतं, त्यांच्या लेखणीतून उमटलेल्या व्यक्तिरेखा त्यांच्या अनुभवांचं बोट धरून आलेल्या आहेत. घराघरातल्या कुठल्या ना कुठल्या घटनेशी, व्यक्तीशी नातं सांगणाऱया त्यांच्या कथा वाचकांना आपल्याशा वाटतात. म्हणूनच जगभरातल्या मराठी वाचनालयात त्यांची पुस्तकं हमखास मिळतात. तिथल्या होमसीक झालेल्या मराठी माणसांना घराची ऊब देणाऱया कथा असतात त्या.

मंगलाताईंना वाटतं, ‘आपलं घर हे आपल्या श्रद्धा आणि निष्ठांचं प्रतिबिंब असतं. भाषणांच्या निमित्ताने खूप फिरले. तेव्हा हॉटेलमध्ये बाईने एकटीनं राहण्याचा प्रघात नव्हता. म्हणून कुणाच्या तरी घरीच उतरायचे. कामगार वस्तीपासून राज्यमंत्र्यांच्या घरापर्यंत अनेक घरं पाहिली. म्हणूनच वाटतं, घरावरून माणसाचं मूल्यमापन होऊ नये. त्या घराचा आणि राहणाऱया माणसांचा किती संवाद आहे ते महत्त्वाचं. माझा आहे तो म्हणूनच काम संपलं की, 5 मिनिटंसुद्धा बाहेर राहावत नाही मला.’ घराचं दार सताड उघडून, तोंडभर हसत ‘या’ म्हणणारा माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस असतो हे पुलंचं वाक्य तंतोतंत लागू पडणाऱया मंगलाताई. आपल्या घरातल्या सोफ्यावर एका कोपऱयात बसून सत्तरीतही सातत्यानं लिखाण करत असतात. म्हणूनच 1980 पासून आतापर्यंत पुस्तकांचं अर्धशतक त्यांच्याकडून पार झालंय. त्या म्हणतात, ‘या सोफ्यावरच्या जागेवरून स्वयंपाकघर आणि सगळीकडेच लक्ष राहातं. घरातलं सगळं सुरळीत सुरू असलेलं दिसत असलं की लिहायला आवश्यक मनःशांती मला मिळते आणि माझे कान मला बंद करता येतात. लेखनाला मूड लागतो असं अवास्तव स्तोम मी माजवत नाही. तसं अलौकिक वगैरे मी काही लिहिलेलं नाही. मी मध्यम प्रतीची लेखिका. टॅलेंटेड, पण गिफ्टेड नाही. त्या टॅलेंटला घासूनपुसून लोकांसमोर आणायचं तर तसा वेळ आणि शक्ती द्यायलाच हवी.’

यशाचे आणि मानाचे तुरे मिळाल्यानंतरही स्वतःबद्दल किती सहज बोलत होत्या मंगलाताई. सकाळी साडेचारला उठायचं. साडेसहापर्यंत लिहायचं. मग मुलं, नवरा यांचे डबे, घरातली कामं, वाचन, लिखाण. टाइम आणि माइंड मॅनेजमेंटनं साधता येतात ध्येये, याचं उदाहरण म्हणजे मंगलाताई. त्या म्हणतात, ‘एखादा विषय जास्त रेंगाळला की त्यातला ताजेपणा संपतो. जसा पहिल्या वाफेचा पदार्थ जितका चवदार लागतो तितका तो पदार्थ चारवेळा गरम केल्यावर लागत नाही ना, अगदी तसाच. म्हणून सुचेल ते तत्काळ लिहिणं मला गरजेचं वाटतं. मी लिहिते माझा जीवनानुभव. महिलांच्या प्रश्नांबद्दल मी लिहिते, कारण मला त्याच्याशी रिलेट करणं सोपं जातं. ओढूनताणून कॉर्पोरेट जगावर, राजकारणावर लिहिणं मला योग्य वाटत नाही. मुंबईला पार्लेश्वर सोसायटीत लहानपण गेलं. 180 बिऱहाडं तिथे. मध्यमवर्गीय. कनिष्ठ मध्यमवर्गीय. वेगवेगळ्या जातींची, आर्थिक स्तरांची. आता बंद दारांची संस्कृती. आता माणसं स्वतःच्या स्तरावर जगतात. मी असा राहतो म्हणून माझ्या मुलालाही हीच शाळा हवी वगैरे. तेव्हा जाती धर्म यांच्या पलीकडे माणसं जगायची. कम्युनिटी लिव्हिंग विदाऊट एनी डाऊट… असं काहीसं. आता समोरचा माणूस आपल्याला एक्सप्लॉईट करायलाच आला आहे अशा भीतीत जगतात सगळे. वाचनाची खूप आवड मला. ब्रेडचा कागदसुद्धा वाचल्याशिवाय कचऱयात टाकला नाही मी लहानपणी. पुस्तकांचा तर फडशाच पाडायचे. गाण्याची आवड. रेडिओ सतत ऐकायचे. घरातला बंद असला तर सोसायटीतला ऐकू यायचा. त्याचा फायदा म्हणूनच की काय, माझ्या लिखाणात लय आहे असं वाचक म्हणतात. शाळकरी वयात अनेक गोष्टी स्पंजासारख्या टिपून घेतल्या गेल्या. वेगवेगळ्या वयाच्या बायकांचं बोलणं, त्यांची राहणी, त्यानुसार बदललेली भाषा, नंतर लिखाणात उमटलीच. बाईच्या भाषेत मी बाईला लिहू शकले ती त्यामुळेच. कॉलेजमध्ये थोडंफार लिहीत होते. पण खरी सुरुवात झाली लग्नानंतर. नवरा, त्याचे 5 भाऊ असं मोठं कुटुंब. ते नाते संबंध अनुभवले. आणि तेही माझ्या लिखणात स्वाभाविकपणे अवतरले.

मुंबई विद्यापीठाचं मराठी भाषाशास्त्र विषयाचं सुवर्णपदक मिळवलं होतं. पण लग्नानंतर कराडसारख्या आडगावत आले. कोयना भूकंपानंतर त्या गावात कोणी उद्योजक पैसे गुंतवत नव्हता. माणसं गाव सोडून जात होती. तिथे काही करण्यासारखं नव्हतं. मग मनात येणारे विचार उतरवत गेले कागदावर. घेत गेले घरबसल्या कल्पनेची भरारी. मेनका, माहेर, अनुराधा मासिकांच्या स्पर्धेसाठी कथा पाठवल्या. बक्षीसं मिळाली. कथा छापल्या गेल्या. हुरूप आला. 1980पर्यंत 12-13 कथा लिहून झाल्या होत्या. त्याचं पहिलं पुस्तक आलं.’
कधी कधी डाव्या हातानं पाळणा हलवून उजव्या हातानं लिहिलं. हेही मंगलाताईंनी बोलता बोलता सांगितलं. अमुक एक कर असं सांगणारं कुणी नसतं, तेव्हा स्वतःच स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया जिवंत ठेवली की काय घडू शकतं ते ऐकत होते मी मंगला ताईंकडून. त्या जे लिहितात ते चांगलंच असेल, असा विश्वास निर्माण होण्यासाठी त्यांनी गेली 40 वर्ष सातत्यानं मेहनत घेतली आहे. महिनो न महिने सिनेमा, नाटक, शॉपिंगसाठी न जाता, भिशी, महिला मंडळ अशा गोष्टीत वेळ न घालवता घर सांभाळून लिखाणासाठी अग्रक्रमानं वेळ दिला त्यांनी. म्हणूनच स्वतःचं अस्तित्व त्या सिद्ध करू शकल्या. त्या म्हणाल्या, ‘स्वयंपाकघरात मिसळणीच्या डब्यात अनेक पदार्थ असतात. सगळे मिळूनच फोडणी होते. पण असं असूनही ते पदार्थ वेगवेगळे ठेवतोच ना आपण! तसंच आयुष्यातही असतं. अनेक कप्पे असतात. कौटुंबिक, सामाजिक, कलात्मक. त्या सगळ्यांना तसंच वेगवेगळं ठेवून सर्वांचं मिळून एक संपूर्ण आयुष्य जगायचं असतं तरच ते चवदार होतं. सवयीनं आणि सरावानं जमतं ते. प्राधान्य ठरवता आलें की जे साधायचं ते साधता येतं. मात्र हे करताना घर आणि घरातली माणसं यांना सर्वात वरच्या स्थानावर ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण आपण घराला 10 टक्के दिलं, तर घर आपल्याला 100 टक्के देतं हे सत्य आहे. घरात जगभरातल्या सगळ्या शोभेच्या वस्तू आणून ठेवायच्या आणि घरासाठी एक ताससुद्धा वेळ द्यायचा नाही. अशा घराला काय अर्थ आहे? माझं घर साधं आहे, मोकळं आहे, आवश्यक सामानच आहे तिथे, पण साधेपणा, थेटपणा, प्रामाणिकपणा हे गुण माझ्यात याच घरानं आणले आहेत. मुलांनाही मी सांगितलं आहे, आपल्याला आपल्या ज्ञानावर जगता आलं पाहिजे. दुसऱयाच्या अज्ञानावर नाही. दुसऱयाला फसवून नाही.’ मंगलाताईंच्या मते घरातल्या प्रत्येक गोष्टीत कलात्मकता असते. भाजी वेगळ्या पद्धतीनं करण्यात, पडदे बदलण्यात, त्यामुळे घरात येणाऱया प्रकाशाचा बदललेला रंग बघण्यात आनंद असतो. तो अनुभवला पाहिजे.’

जगातलं सगळ्यात थंड हवेचं ठिकाण म्हणजे घर, असं म्हणणाऱया मंगलाताईंनी भरपूर गप्पा मारल्यावर मला हळूच सांगितलं, आता आपल्याला बोलणं थांबवावं लागणार आहे. कारण मला माझ्या यजमानांना औषध द्यायचं आहे. नात्यातला तो विलक्षण गारवा अनुभवत मंगलाताईंचा निरोप मी घेतला. तेव्हा वाटलं खरंच, मंदिराच्या भव्य दिव्यतेपेक्षा गाभाऱयातल्या देवाला महत्त्व असायला हवं आणि हेच तत्त्व घरालाही लागू करायला हवं.