
रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आता विद्यार्थी आणि पालकांवरच जबाबदारी टाकण्याची भूमिका घेतली आहे. रॅगिंग करणार नाही असे विद्यार्थी आणि पालकांना लिहून देणे अनिवार्य करा असे निर्देश यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना दिले आहेत.
यूजीसीच्या निर्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला ‘मी रॅगिंग करणार नाही’ आणि पालकांना ‘माझा पाल्य रॅगिंग करणार नाही’ असे प्रत्येक वर्षी लिहून द्यावे लागणार आहे. यूजीसीने सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
यूजीसीने रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी 2009 मध्ये कायदा बनवला. प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयाला तो बंधनकारक आहे. तक्रार करण्यासाठी यूजीसीने 1800-180-5522 हा टोल-फ्री क्रमांक तसेच [email protected] हा ई-मेल दिला आहे.
यूजीसीची रॅगिंगची व्याख्या
यूजीसीच्या कायद्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱया विद्यार्थ्याला त्याचा धर्म, जात, वर्ण, लिंग, व्यक्तिमत्त्व, राष्ट्रीयत्व, प्रदेश, भाषा, जन्मस्थळ, निवासस्थळ किंवा त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत शारीरिक आणि मानसिक त्रास देणे करणे म्हणजे रॅगिंग मानले जाते.
























































