पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ महिला कर्मचार्‍यांची तत्परता; विरार स्थानकात महिला प्रवाशाचा जीव वाचवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेचे रेल्वे प्रोटेक्शन फोर्समधील (RPF) जवान प्रवाशांच्या जीवाचे रक्षण आणि सुरक्षिततेसाठी नेहमीच आघाडीवर असतात. ऑपरेशन “जीवन रक्षा” अंतर्गत, आरपीएफ जवान जीव वाचवण्यासाठी तत्परता आणि प्रसंगावधान दाखवतात. हेड कॉन्स्टेबल यामिनीकांत मिश्रा यांनी विरार स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तत्परता आणि प्रसंगावधान दाखवले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकात याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई उपनगरीय विभागात 12 जानेवारी रोजी सकाळी 08.07 च्या सुमारास गर्दीच्या वेळेत नेहा अंकेश (वय 27) विरार स्थानकावर प्लॅटफॉर्मवरून धावती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होती. चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना ती घसरली आणि खाली पडली. हेड कॉन्स्टेबल यामिनीकांत मिश्रा यांनी प्रसंगावधान आणि तत्परता दाखवत तिला चालत्या ट्रेनमधून खेचले आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील दरीमध्ये पडण्यापासून तिला वाचवले. या अपघातात तिच्या पाठीवर किरकोळ दुखापत झाल्यामुळे प्रथमोपचार करण्याची व्यवस्था केली. आपले जीव वाचवल्याबाबत नेहाने कृतज्ञता व्यक्त केली आणि तिला वाचवल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल यामिनीकांत मिश्रा यांचे आभार मानले आहेत.