झेवियर्सचा मल्हार ऑनलाईन! यंदा तीनऐवजी एकच दिवस रंगणार महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉलेजियन्स ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात त्या संत झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ या महोत्सवाची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या महोत्सवात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. यंदा तीनऐवजी एकच दिवस म्हणजे 29 ऑगस्टला मल्हार महोत्सव रंगणार आहे. विशेष म्हणजे 42 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा महोत्सव ऑनलाईन होणार आहे.

आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन फेस्टिव्हल अशी मल्हार महोत्सवाची ओळख आहे. मुंबईच्या संत झेवियर्स कॉलेजातील विद्यार्थ्यांकडून या महोत्सवाचे आयोजन केले जाते. 1979पासून सुरू झालेल्या मल्हारने गेली 42 वर्षे अभूतपूर्व अनुभव दिला आहे. देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होतात. तीन दिवस कला, नाटक, संगीत, साहित्य अशा विविध विभागांमध्ये स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. गतवर्षी कोरोनामुळे हा महोत्सव पार पडला नव्हता. त्यामुळे कॉलेजियन्स काहीसे निराश झाले होते. यंदा मात्र त्याच जोश आणि उत्साहाने महोत्सव होणार आहे.

अशी असणार थीम

मल्हारची थीम काय असणार याकडे साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. ‘पॅरलॅक्स ः द लेगसी रिरुटेड’ ही यंदाच्या महोत्सवाची थीम आहे. सध्याच्या न्यू नॉर्मल स्थितीत महोत्सवाच्या स्वरूपात बदल होणार आहेत. हे बदल होत असतानाही महोत्सवाची इतक्या वर्षांची परंपरा जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. मल्हार महोत्सवात मौजमस्तीसोबत विद्यार्थ्यांना बौद्धिक मेजवानीदेखील मिळते. चर्चासत्रामध्ये अनेक दिग्गज मान्यवर सहभागी होतात. यंदा हे मान्यवरदेखील ऑनलाईन हजेरी लावताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध स्पर्धाही ऑनलाईन होतील.