Yavatmal crime news – यवतमाळ नगरपरिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांसह चौघांना लाच घेताना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ नगरपरिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रभारी नगर परिषद अभियंता निखिल पुराणिक, उद्यान परिवेक्षक शताशी उभाळकर आणि लिपिक साजिद शेख वजीर यांच्यासह पुराणिक याचा खासगी हस्तक सतीश जीवने यालाही अटक करण्यात आली आहे.

यवतमाळ नगरपरिषदेत कंत्राटदाराला केलेल्या कामाची देयके काढण्यासाठी आरोपींनी 4 लाखाची लाच मागितली होती. तडजोडी अंती ही रक्कम 1 लाख 80 हजाराची इतकी ठरली. यामुळे कंत्राटदाराने त्रस्त होऊन थेट एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने सापळा रचत नगर परिषद बांधकाम विभागातच 1 लाख 80 हजाराची लाच घेताना नगर परिषद अभियंत्यासह चौघांना अटक केली

नगर परिषदेतील बांधकामाचे सुमारे 8 लाख रुपयाचे देयके काढण्यासाठी तब्बल 50 टक्के रकमेची म्हणजे 4 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. जवळपास एक वर्षांपासून कंत्राटदार या बिलासाठी नगर परिषद येथे येरझारा मारीत होता. शेवटी तडजोडीनंतर 20 टक्के रक्कम देऊन देयके काढण्याचे नगर परिषद अभियंता पुराणिक यांनी मान्य केले होते. शेवटी या कर्मचाऱ्यांना एसीबीने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक केतन मांजरे, चित्र मेहेत्रे, अनिल वानखेडे, वैभव जायला आशिष जांभूळकर सतीश किटकुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, सलग 7 वेळा निवडून आलेले माजी नगर सेवक दत्ता कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार नगर परिषद हे पैसे खायचे जणू कुरणच बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. नगर परिषद यवतमाळ येथे सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.