
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
सण संक्रांतीचा जवळ आला की सर्वाना वेध लागतात पतंगबाजीचे. शहर परिसरात मकरसंक्रातीला होणारी पतंगबाजी पाहता पशु पक्ष्यांसह दुचाकीस्वार, सायकलस्वारांना नायलॉन मांज्यामुळे वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या सणासंबंधाने अवैध मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेवुन कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबवून अवैध नायलॉन मांजा विक्रेत्यांवर विरुध्द कारवाई करण्याचे आदेश यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी दिले. त्या अनुषंगाने मोहिम राबवित असतांना गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बंटी नंदकिशोर सिवोटीया यांच्या पतंगासाठीच्या प्रसिद्ध दुकानामध्ये धाड मारली. त्यात शासनाने प्रतिबंध केलेला नायलॉन मांजा त्यांच्या दुकानात आढळून आला. या कारवाईत एकुण 5,67,500/-₹ चा मुद्देमाल आरोपी बंटी नंदकिशोर सिवांटीया याचेकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली असून सुद्धा याची सर्रास विक्री होत आहे. विशेषतः थंड हवामानाची सुरवात होताच आणि संक्रांत जवळ आली की पंतंगबाजीचे वेध सुरु होतात. कित्येक ठिकाणी तर पतंग उडवायचा स्पर्धा सुद्धा भरविल्या जातात. पतंगबाजीची आनंदसोबत स्पर्धा ही आलीच. आपली पतंग अधिकाधिक उंच जावी, दुसऱ्याची पतंग कापून त्यावर मात करावी. या स्पर्धेतूनच बंदी असलेला नायलॉन मांजाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो. पण हा आनंदोत्सव साजरा करताना अनेक प्राणी आणि पक्ष्यांवर सुद्धा संक्रांत येते. फक्त पशु पक्ष्यांवरच संक्रांत येते असे नसून कित्येक नागरिक या मांजामुळे जखमी झाले आहेत. याचमुळे सरकारने नायलॉन मांजावर सरसकट बंदी आणली आहे. या निर्णयाचे नागरिकांनी आणि वन्यजीव प्रेमी यांनीं स्वागत देखील केले आहे. तरीही नायलॉन मांजाची विक्री होते ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
आरोपी बंटी नंदकिशोर सिवांटीया याचेकडून एकुण 5,67,500/-₹ चा मुद्देमाल जप्त करुन कलम 188 भादंवि सह कलम 5.15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये पो.स्टे. यवतमाळ शहर येथे कारवाई करण्यात आलेलो आहे. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर, पोलीस अमलदार विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे, योगेश गटलेवार, योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
























































