कर्नाटकात भाजप आमदारांचे बंड; पैसे घेऊन मंत्रिपद वाटत असल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून भारतीय जनता पक्षातील (भाजप) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या काही आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले असून मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आणि पैसे देण्याऱ्यालाच मंत्रिपद दिले जात आहे, असा आरोप आमदार बसनगौडा यतनाल यांनी केला आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार बसनगौडा यतनाल यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे असा सल्लाही दिला आहे. जो कोणी ब्लॅकमेलिंग करतो किंवा जास्त पैसे देतो त्याला मंत्रिपद दिले जात आहे. यासाठी एक सीडी कोटा आणि सीडी प्लस कोटा आहे, असा आरोपही आमदार यतनाल यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना सीडीची भिती दाखवून ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आमदार बसनगौडा यतनाल यांच्यासह आमदार कालाकप्पा बंदी यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत शिपाई असून या मंत्रिमंडळ विस्ताराने मला आनंद झालेला नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार कालाकप्पा बंदी म्हणाले. तसेच – सुनील कुमार, सतीश रेड्डी, रेणुकाचार्य, एमएलसी विश्वनाथ, अभय पाटिल, अरविंद बेलाड या आमदारांनी देखील उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे.

आज मंत्रिमंडळ विस्तार

दरम्यान, कर्नाटकमध्ये आज सायंकाळी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून 7 नव्या मंत्र्यांना शपथ दिली गेली. याची यादी देखील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडे सोपवली आहे. अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर या नावांवर मोहोर उमटवली गेली. मात्र तत्पूर्वी अनेक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या