येलदरी धरणाच्या 934 दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यातून 59 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावर उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाला 1 जानेवारी रोजी 52 वर्ष पूर्ण होत असून या प्रकल्पातून आतापर्यंत शेकडो मेगावॉट विजेची निर्मिती झाली आहे. यातून शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अखंडितपणे सुरू असलेल्या या प्रकल्पाचा शुक्रवारी वर्धापनदिन आहे.

देशाचे तत्कालीन गृह तथा वित्तमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले. या धरणाच्या पाण्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील 60 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तसेच या तिन्ही जिल्ह्यांतील 23 हून अधिक गावे पिण्याचे पाणी येलदरीतून घेतात. याच येलदरी प्रकल्पावर 1 जानेवारी 1969 रोजी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. येलदरी धरणात एकूण 934 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. त्यापासून 59 दशलक्ष युनिट इतक्या विजेची निर्मिती होते. हे धरण आतापर्यंत 30 ते 35 वेळा पूर्ण भरले आहे. त्यातून जवळपास 18 दशलक्ष घनयुनिट विजेची निर्मिती झाली आहे. यावर्षी येलदरी धरणाच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.

सुमारे 7 वर्षानंतर येलदरी धरण 100 टक्के भरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे लागले. या अतिरिक्त पाण्यावर 72 दिवस अखंडितपणे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्यातून तब्बल 14 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल वीजनिर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीत जमा झाला. गेल्या 52 वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या जलविद्युत प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तरीही उपलब्ध मनुष्यबळावर पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मिती करण्याचे कसब येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवले आहे.

येलदरी प्रकल्पातील जलविद्युत केंद्रात 7.5 मेगावॅट क्षमतेचे प्रलोको 3 विद्युत निर्मिती संच आहेत. या 3 संचाच्या माध्यमातून 22.50 मेगावॅट वीजनिर्मिती एकाचवेळी करण्याची या केंद्राची क्षमता आहे. येलदरी प्रकल्पातून 28 डिसेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. त्यानुसार 3 पैकी 2 संचाद्वारे सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून 15 मेगावॅट वीज तयार होणार आहे.