व्हॉटस्ऍपवर तरुणीची छळणूक; अश्लील मेसेज, फोन करणाऱया तरुणाला बेडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रात्रीअपरात्री केव्हाही व्हॉटस्ऍपवर अश्लील मेसेज, फोन करून तरुणीचा छळ करणाऱ्या एका माथेफिरू तरुणाच्या शीव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चार महिने आरोपी तरुणीला त्रास देत होता.

शीवमध्ये राहणारी मेरी (नाव बदललेले) हिची वर्षभरापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या एका लग्नसमारंभात आरोपी आतिफ सय्यद (29) या तरुणाशी ओळख झाली होती. फेब्रुवारी महिन्यात या तरुणाने मेरीशी संपर्क साधून एका इव्हेंटसाठी तरुणी पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर तो तिला नियमित व्हॉटस्ऍवर मेसेज करू लागला. मेरीने त्याला रिप्लाय देणे टाळले. याचा राग आल्यामुळे आतिफने तिला अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली. जास्त नाटक केलेस तर तुझ्या आईला ठार मारीन अशी धमकी देखील दिली.

त्यामुळे मेरीने या जाचाला कंटाळून 30 मे रोजी शीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड व पोलीस निरीक्षक पोपटघळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाग्यश्री मुळीक, रामदास कदम तसेच अनिल साळुंखे व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर मुळीक व त्यांच्या पथकाने नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आतिफ सय्यदच्या मुसक्या आवळल्या.