
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः फेसबुक, इन्स्टाग्रामवर ‘रील’चे शॉर्ट व्हिडीओ केले जातात. अनेकजण त्यांच्या आवडीचे व्हिडीओ शेअर करतात. रील बनविण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी व्हिडीओ काढले जातात; यात अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशीच घटना जामखेड शहरात घडली आहे. फाशीचे रील बनविण्याच्या नादात खरोखरच तरुणाला फास बसला आणि तरुण बेशुद्ध पडला. वेळीच ही घटना लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्परता दाखवत त्याला रुग्णालयात दाखल केले. यामध्ये तरुणाचे प्राण वाचले आहेत.