
सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम
केरळच्या त्रिशूरमध्ये एका युथ काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. मृत कार्यकर्त्याचे नाव नौशाद आहे. त्रिशूरमधील चावक्कडमध्ये नौशाद उभा होता तेव्हा आठजणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. जखमी नौशादला इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नौशाद युथ काँग्रेसचा कार्यकर्ता होता. सदर हत्या ही राजकीय हत्या असल्याचा अरोप काँग्रेसने केला आहे. तसेच या मागे माकप, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षांचा हात असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नौशादसोबत एक मित्र बाईकवरून आले. त्यानंतर जीपभरून काही लोक आले आणि नौशादवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनीही सोशल डेमोक्रेटिक पक्षावर संशय व्यत केला आहे. परंतु कुठल्याच प्रकारचे पुरावे मिळाले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. केरळमध्ये राजकीय हत्या या नित्याच्याच झाल्या आहेत. राज्यात अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामागे डाव्यांचा हात असल्याचा आरोप नेहमी होतो.



























































