सेल्फीच्या मोहापायी सिंहगडावरून तरुण पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खडकवासला

धोकादायक ठिकाणी हौस म्हणून मोबाईल सेल्फीतून स्वतःची छबी टिपताना परिणामांची तमा न बाळगल्याने आज (रविवारी) सकाळी सिंहगडावरील बारुदखाना पॉइंटवरून सुमारे अडीचशे ते तीनशे फूट खोल दरीत पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. येथील घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक, स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी वेळीच धाव घेऊन मोठय़ा कष्टाने गंभीर जखमी झालेल्या या तरुणास दरीतून बाहेर काढले.

आज रविवारी किल्ले सिंहगडावर ही दुर्दैवी घटना घडली. गडावरील बारुदखाना पॉइंटवरून जवळपास अडीचशे फूट खोल दरीत पडलेल्या या जखमी तरुणाचे नाव तुषार प्रकाश दळवी असे आहे. जखमी तुषार दळवी रविवार असल्याने आपल्या मित्रमंडळींसमवेत सिंहगडावर आले होते. सकाळी गड फिरत असताना ते पुणे दरवाजापासून पुढे बारुदखाना परिसरात गेले होते. या ठिकाणी नव्याने तटबंदीचे काम हाती घेतले गेल्याने त्या ठिकाणावरून सिंहगड घेरा परिसरातील हिरवाईने नटलेले समोरचे डोंगर व खडकवासला धरणाच्या साक्षीने त्यांना स्वतःची छबी सेल्फीत टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

उंच व धोकादायक दरीच्या काठावरून सेल्फी काढत असतानाच अचानक त्यांचा तोल गेल्याने ते अडीचशे फुटांपेक्षा अधिक खोल दरीत कोसळले. अचानक घडलेल्या या प्रसंगाने मित्रमंडळी व आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड करून मदतीसाठी याचना केली. या घटनेची माहिती मिळताच घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी खाली खोल दरीत धाव घेतली.

summary- youth fall off while taking selfie at sinhagad