ठेकेदाराचा हलगर्जीपणा: उरणमध्ये विजेचा धक्का लागून आणखी एक तरूण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shock

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जसखार गावातील एका 12 वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून तो जबर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.31) त्याच ठिकाणी आणखी एका युवकाला विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला आहे. सिद्धांत दप्तरे (18) असे या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. विजेच्या वाहिनी खालून जात असताना त्या वाहिनीचा धक्का सिद्धांतला बसला. त्यात तो गंभिर जखमी झाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे दोन अपघात झाले असल्याने या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी जसखारच्या ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी यश शेळके या 12 वर्षाच्या मुलाला याच ठिकाणी वीजेचा धक्का लागला होता.

जसखार गावाजवळ चौथ्या बंदरासाठी रस्ता बनविण्याचे काम सूरू आहे. जे कुमार इन्फ्रास्टक्चर ही कंपनी हे काम करत आहे. यासाठी माती दगडाचा भराव सूरू आहे. हा भराव वीज वाहिनीच्या खालून जात असल्याने त्यामुळे वीज वाहिनी भरावापासून चार फुटापर्यंत खाली आली आहे. या वीजवाहिन्याच्या खालून जात असताना विजेच्या तारेचा अंदाज सिद्धांतला न आल्याने वीज वाहिनीचा डोक्याला स्पर्श होऊन जोरदार धक्का बसला आणि जबर जखमी झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच या दोन मुलाना विजेचा शॉक लागला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक वेळा निवेदने आणि विनवण्या करून देखिल पोलिस प्रशासन व कंपनी ही वीजेची लाईन येथून हटविण्यास तयार नाही. जर पहिल्या अपघातानंतर येथिल तारा हटविल्या असत्या किंवा त्या उंचावर नेल्या असता तर रविवारचा अपघात झाला नसता. अपघाताला कारणीभूत असणारे जे कुमार कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्यावर या प्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.