चांगला डान्स करत होता म्हणून केला खून, दोन आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्यापेक्षा चांगला नाचत होता म्हणून रागाच्या भरात एका तरुणाने दुसर्‍या तरुणावर गोळी झाडून त्याचा खून केला. दिल्लीतील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

वाल्मिकी जयंती निमित्त एका मिरवणुकीदरम्यान अविनाश हा डान्स टीचर तरुण नाचत होता. तेव्हा ऋषभ नावाचा हा डान्स टीचर त्याला नाचण्यात आव्हान देत होता. दोघांची नाचण्यात जुगलबंदी झाली पण अविनाश ऋषभवर भारी पडत होता. उपस्थित समुदाय अविनाशच्या डान्सवर खूश होऊन शिट्या आणि टाळ्या वाजवत होते. ऋषभला ही बाब पचनी पडली नाही.

 रागाच्या भरात त्याने आपल्या मामेभावाकडील देशी कट्टयातून अविनाशला गोळी मारली. डीजेच्या आवाजात गोळीचा आवाज ऐकू आला नाही. काहीच वेळात अविनाशला काही जाणवले त्याने टीशर्ट काढले तेव्हा रक्त आढळले आणि तो जागीच कोसळला. उपस्थित लोकांनी त्याला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल केले. पण त्याचा तिथे मृत्यू झाला.

गोळी मारल्यानंतर ऋषभ आणि त्याचा मामेभाऊ तिथून पसार झाले. आरोपींना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. उपस्थित जमावाने काही व्हिडीओ काढले होते. त्यातून पोलिसांनी दोन्ही आरोपींचे पोस्टर शहरात लावले आणि आरोपींना पकडण्यात त्यांना यश आले.