
शेतातील सामायिक विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून चुलत भावाने 25 वर्षांच्या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजता जालना तालूक्यातील मौजपूरी येथे घडली आहे. या खुनातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार झाले आहेत. योगेश बाबासाहेब डोंगरे (25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याआधी बुधवारी सकाळी झालेला वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. मात्र, रात्री उशीरा बाहेरगावी राहणाऱ्या चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट दिली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी मृताचे वडील बाबासाहेब डोंगरे यांच्या तक्रारीवरून शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे, पंडित डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, नानीबाई डोंगरे, कविता डोंगरे, आसाराम डोंगरे, या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घुगे करीत आहेत.
























































