
सामना ऑनलाईन, भिवंडी
निजामपुरा पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करीत २००६ मध्ये भिवंडीत जातीय दंगल घडविणारा मास्टरमाइंड रझा अकादमीचा शहराध्यक्ष मोहम्मद युसूफ मोहम्मद इब्राहिम मोमीन ऊर्फ युसूफ रझा (३०) याला निजामपुरा पोलिसांनी तब्बल १२ वर्षांनंतर अटक केली.
भिवंडीतील कोटरगेट येथील निजामपुरा येथे पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात येणार होती. या इमारतीला विरोध करीत रझा अकादमीचा भिवंडी प्रमुख युसूफ रझा आणि सचिव शकील रझा यांनी मुस्लिम समाजाला चिथावणी देत ५ जुलै २०१६ रोजी जातीय दंगल भडकवली. या दंगलीत पोलिसांवर हल्ले करण्यात आले. पोलीस व्हॅन आणि एसटीच्या बसेसही जाळण्यात आल्या. या जातीय दंगलीत भिवंडी आठ दिवस जळत होती. यावेळी जात्यंधांनी पोलीस उपायुक्त आर. डी. शिंदे यांच्यासह ३९ पोलीस कर्मचाऱयांवर हल्ले करून त्यांना जखमी केले तर पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश जगताप आणि कॉन्स्टेबल बी. एन. गांगुर्डे यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी युसूफ रझा याच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर युसूफ रझा फरार होता.
पक्की खबर मिळाली
युसूफ रझा सौदी अरेबियातून हिंदुस्थानात परतत असल्याची पक्की खबर भिवंडी पोलिसांनी त्यांच्या खबऱयाने दिली. त्यानुसार भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी देशातील सर्व विमानतळांवर रेडऍलर्ट दिला होता. शनिवारी रात्री रझा छत्रपती शिवाजी महाराज सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एअरपोर्ट पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला भिवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.






























































