बस झाले, प्रेमाची विकृती दाखवणारे प्रोमो आता थांबवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रेमाचा विकृत रंग दाखविणाऱ्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या आगामी मालिकेचे प्रोमो सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर दाखविण्यात येत आहेत. हे प्रोमो इतके भयंकर आहेत की ते पाहून प्रत्येकाच्याच मनात एकप्रकारची चीड निर्माण होत आहे. याचा विपरीत परिणाम युवा पिढीवर होण्याची शक्यता असून प्रेक्षकवर्गात प्रचंड संताप आहे. बस झाले, प्रेमाची विकृती दाखवणारे प्रोमो आता थांबवा अशी मागणीच आता राज्यभरातील प्रेक्षकांकडून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे प्रोमो विविध मराठी वाहिन्यांवरून प्रसारित होत आहेत. बातम्या किंवा एखादी कौटुंबिक मालिका बघण्यासाठी कुटुंबीय एकत्र आल्यानंतर मध्येच या मालिकेचे भयानक प्रोमो दिसतात. यावेळी लहान मुलेही टीव्ही बघत असतात. त्यांच्याही मनावर या प्रोमोंचा नकळत परिणाम होत आहे. त्यामुळे हे असले प्रोमो तातडीने बंद करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे.

पालकवर्ग चिंतेत

सध्या गुन्हेगारी विश्वातील अनेक थरारक कथा दाखवणाऱ्या मालिका हिंदी वाहिन्यांवरूनही प्रसारित होत आहेत. या मालिकांचा नकळत परिणाम युवा पिढीवर होत आहे. सध्या एकतर्फी प्रेमातून हत्या, आत्महत्या केल्याचेही अनेक गुन्हे घडले आहेत. आता मराठी वाहिनीवर अशाप्रकारची मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे पालकवर्ग प्रचंड चिंतेत आहे.

युवासेनेची उद्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या कार्यालयावर धडक

या मालिकेतून दाखविण्यात येणारा विकृत भाग तत्काळ वगळावा यासाठी सोमवारी दुपारी बारा वाजता शिष्टमंडळ ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या लोअर परळ येथील कार्यालयावर धडक देणार आहे. डेली एपिसोडच्या नावाखाली मालिकेतून काहीही विकृत दाखवलेले खपवून घेणार नाही. विकृत भाग तत्काळ न वगळल्यास युवासेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी दिला आहे.