अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शाळेची व्यवस्था करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील 210 अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱया सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शाळेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्याकडे करण्यात आली आहे. या अनधिकृत शाळा ज्या भागात आहेत त्या ठिकाणी मुंबई महापालिकेची शाळा नाही. तसेच तेथील लोकवस्ती मध्यमवर्गीय व संख्येने जास्त आहे. त्यामुळे या भागात महापालिका शिक्षण विभागाने नवीन शाळा सुरू करावी, असे युवासेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मुंबई महापालिकेने अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बंद कराव्यात, अन्यथा शाळा व्यवस्थापनांवर ‘एफआयआर’ दाखल करून फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आरटीई’ अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही शाळा पालिका किंवा शासनाच्या मान्यतेशिवाय चालवता येत नाही. यामध्ये शाळांवर दंडात्मक किंवा पोलीस कारवाई होऊ शकते. असे असताना मुंबईत शेकडो शाळा बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यामुळे पालिकेकडून या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेना कार्यकारिणी सदस्य ऍड साईनाथ धोत्रे, सहसचिव ऍड संतोष धोत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अनधिकृत शाळा बंद करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे तडवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्या विभागात अनधिकृत शाळा आहेत तेथे महापालिकेची शाळा सुरू करावी, जेणेकरून पालकांची आर्थिक स्थिती व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या दोन्हीच्या दृष्टीने सोईस्कर ठरेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.