
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाने त्यांचा अहवाल आज सरकारला सादर केला. या अहवालावरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिक अरविंद कुमार यांच्याकडे अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अभ्यास गटाचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी हा अहवाल मंत्रालयात सुपूर्द केला. यावेळी मुश्रीफ म्हणाले की, अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेतला होता. या अभ्यास गटाने आज आपला अहवाल सादर केला असून त्याचा अभ्यास करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात शासनस्तरावरून लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.






























































