विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांवर नेऊन इतिहासकथन

सामना प्रतिनिधी । मुंबई

इतिहास हा मनोरंजक पद्धतीने सांगितला गेला तर तो लवकर समजतो आणि कायमचा लक्षातही राहतो. लहान मुलांना इतिहास सांगताना ही काळजी घ्यायलाच पाहिजे किंबहुना त्यांना प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांवर नेऊन इतिहास सांगितला पाहिजे. ठाणे येथील दिपेश वेदक या २३ वर्षीय तरूणाने त्यासाठी पुढाकार घेतला. शालेय विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यावर नेऊन इतिहास सांगण्याचे व्रत त्याने घेतले आहे.

दिपेश हा इतिहासप्रेमी आहे. इतिहास विषय घेऊन पदवीधर झालेल्या दिपेशचा गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणे हा आवडता छंद. अनेक मुलांना इतिहास आवडत नाही. कारण तो रंजक पध्दतीने त्यांना सांगितलाच जात नाही, असे दिपेश म्हणतो. दिपेशने आपण स्वत:च त्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. काही तरुणांच्या मदतीने त्याने नुकतीच ४० विद्यार्थ्यांची एक सहल आयोजित केली होती. बोरीवलीच्या मंगूभाई दत्ताने शाळेतील या विद्यार्थ्यांना त्यांनी सुधागड किल्ल्यावर नेले.
रायगड जिह्यातील सुधागड किल्ल्यालाही एक इतिहास आहे. किल्ल्यावरील प्रत्येक ऐतिहासिक स्थळांवर नेऊन दिपेश आणि त्याच्या सहकाऱयांनी त्या विद्यार्थ्यांना इतिहास सांगितला. प्रत्येक स्थळाला एक इतिहास आहे आणि तो ऐतिहासिक दाखले देऊन मनोरंजक पध्दतीने सांगितला गेल्याने विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद लाभला असे दिपेशने सांगितले. यापुढेही विद्यार्थ्यांसाठी अशाच सहली आयोजित करत राहणार असल्याचे त्याने सांगितले.