विनासायास बारीक व्हा!

सुजित पाटकर,[email protected]

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी स्थुलता आणि मधुमेहमुक्त हिंदुस्थान करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी सुरू केली आहे एक आगळीवेगळी आहारपद्धती…

खाण्यावर प्रचंड प्रेम, पण सुटलेलं पोट या दोघांच्या कचाटय़ात तुम्हीही सापडला आहात का? वेळेत वजन कमी नाही केलं तर लवकरच डायबेटिस आणि इतर समस्या मागे लागतील या विचाराने अनेकांसारखी तुमचीही झोप उडाली आहे का? घाबरू नका. ही कुठल्याही वजन कमी करण्यासाठीच्या महागडय़ा उपायांची जाहिरात नाही.

हा आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा विनासायास वेटलॉस डाएट प्लॅन. प्रत्येक जाड माणसाची हीच इच्छा असते की फार कष्ट न करता आणि आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन वजन कमी झालं पाहिजे व फार व्यायामही करायला लागायला नको. आता या सगळ्या गोष्टी केल्यावर वजन कमी निश्चितच होणार नाही हे कोणताही सुजाण सांगू शकेल. पण थांबा! या सगळ्या गोष्टी सांभाळूनसुद्धा तुमचं वजन अगदी खात्रीशीर पद्धतीनं कमी होणं आता शक्य आहे. तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. डॉक्टर दीक्षित यांनी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि डायबेटीस म्हणजेच मधुमेह-मुक्त हिंदुस्थान आणि विश्व करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी विनासायास वेटलॉस हे अभियान राबवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आजपर्यंत हजारो लोकांना वजन कमी करण्यास आणि डायबेटीसपासून सुटका मिळवण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की, इतका खात्रीशीर उपाय असूनसुद्धा डॉक्टर दीक्षित आणि त्यांची टीम कोणत्याही व्यक्तीकडून एकही नवा पैसा आकारत नाही.

स्व. श्रीकांत जिचकार यांनी सांगितलेल्या ‘डाएट प्लॅन’मधून प्रेरणा घेऊन त्याबाबत स्वतःवर संशोधन करून डॉक्टर दीक्षितांनी हा गुणकारी ‘डाएट प्लॅन’ तयार केला आहे. या अभियानांतर्गत आजवर त्यांनी बत्तीस देशांतल्या अठ्ठावीस हजार लोकांना जोडले आहे.

diet-2

डॉक्टर जगन्नाथ दीक्षित

गेल्या २८ वर्षांपासून ते विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन औषध वैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

त्यांना आरोग्य शिक्षणातील भरीव कामासाठी ३ राष्ट्रीय व ४ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

ते स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक वेळा रक्तदान केले आहे.

त्यांनी डब्ल्यूएचओ, युनिसेफ अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.

गुणकारी आहार नियोजन

या डाएट प्लाननुसार तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळेलाच खाऊ शकता.

या दोन वेळा नेमक्या कोणत्या हे तुम्ही तुमच्या भुकेच्या अनुषंगाने ठरवू शकता.

या दोन वेळांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.

या दोन्ही वेळी तुम्हाला तुमचे जेवण हे ५५ मिनिटे पूर्ण होण्याच्या आत संपवायचे आहे.

diet-4

दोन जेवणांच्या मध्ये कोणताही नॉन डायबेटिक पेशंट हा पाणी, शहाळ्याचे पाणी, एक टोमॅटो, ७५ टक्के पाणी २५ टक्के दूध असा चहा, पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी (कशातच साखर वा शुगर फ्री नाही.) इ. प्राशन करू शकतो. शक्यतो काहीही न खाणे उत्तम. जेवणात गोड पदार्थांचे प्रमाण कमीत कमी व प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्ती असावे.

कुठल्याही डायबेटिक (टाइप २- चाळिशीनंतर येणारे डायबेटिस) पेशंटने मधल्या दोन वेळी शक्यतो काहीही खाऊ नये. त्यातल्या त्यात पातळ ताक चालेल व गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत.

डाएट प्लॅन फॉलो करण्याबरोबरच दररोज पंचेचाळीस मिनिटांत साडेचार किलोमीटर चालणे हेसुद्धा आवश्यक आहे.

वरील प्लान अठरा वर्षांखालील मुलांनी व टाइप १ डायबेटिक पेशंट्सनी करू नये.

प्लॅन यशस्वी होण्यामागचं विज्ञान

आपल्या शरीरात आपण कोणतीही गोष्ट खाल्ली की इन्सुलिनचे एक माप स्वादुपिंडातून स्रवले जाते.

मोठय़ा प्रमाणात अतिरिक्त इन्सुलिन निर्माण झाल्यावर त्याचा परिणाम डायबेटीस आणि लठ्ठपणा असा होतो.

एक इन्सुलिन माप निर्माण झाल्यानंतर ते ५५ मिनिटे कार्यरत असते व त्यानंतर दुसरे माप निर्माण होते.

खाण्याच्या वेळा कमी करून इन्सुलिन निर्माण होण्यावर आपण निर्बंध घालू शकतो ज्या योगे डायबेटिसवर व लठ्ठपणावर मात करता येऊ शकते.

वजन आणि मधुमेह कमी होण्याबरोबरच याचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, हायपर ऍसिडिटी यांसारखे रोग हळूहळू कमी होऊन नंतर नाहीसे होतात. सांधेदुखी, पाठदुखी किंवा इतर अवयवांचं दुखणंही दूर पळतं. निद्रानाश दूर होतो व झोप नियमित आणि चांगली येते. मन प्रसन्न राहतं. काम करायला नवी ऊर्जा मिळते हे व यासारखे इतरही फायदे प्रत्येक माणसाला वेगवेगळे मिळतात.

diet-5

वजन वाढवायला तुम्हाला अनेक वर्षे लागली आहेत. आता कमी करायला किमान 3 महिने ते एक वर्ष तरी देऊन बघा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल. ‘एफर्टलेस’ वजन कमी करणं अशक्य आहे. पण हा प्लॅन तुम्हाला ‘लेस’ एफर्ट्समध्ये वजन आणि डायबेटिस दोन्ही कमी करायला मदत करेल.

अभियानात सामील व्हायचंय

या अभियानात तुम्हालाही सामील होता येईल. त्यासाठी काय कराल?

हा डायट प्लान सुरू करण्याआधी तुमचं फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीएवनसी या घटकांची रक्तातली तपासणी करून घ्या. तपासणीच्या रिपोर्टचे फोटो दीक्षितांच्या अभियानातील व्हॉट्सऍप ऍडमिन्सना पाठवा. ऍडमिन तुम्हाला तुमच्या रिपोर्टप्रमाणे योग्य असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करतील. ज्याद्वारे तुम्ही डॉक्टर दीक्षितांशी थेट संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला दररोज मधुमेह आणि वजन कमी केलेल्या लोकांच्या यशस्वी गोष्टी (सक्सेस स्टोरीज) वाचायला मिळतील.

तुम्ही विनासायास वेटलॉस (एफर्टलेस वेटलॉस) हा फेसबुक ग्रुपसुद्धा जॉइन करू शकता.

व्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिनचे नंबर हे फेसबुक ग्रुप किंवा गुगलवर उपलब्ध आहेत. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डॉक्टर दीक्षितांचे ‘यू टय़ूब’वरचे व्हिडीओज्सुद्धा पाहू शकता.

डॉक्टर दीक्षित आणि त्यांची साठ लोकांची कुठलाही पैसा न घेता काम करणारी टिम यांचे अंतिम ध्येय हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मधुमेहापासून मुक्ती मिळणाऱया उपायांमध्ये हा ‘डाएट प्लॅन’ समाविष्ट होणे हे तसेच या डायट प्लानच्या मदतीने संपूर्ण हिंदुस्थान आणि संपूर्ण विश्व हे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त करणे हे आहे. या डाएटमुळे प्रत्येकालाच एक आयुष्य बदलून टाकणारा अनुभव मिळेल यात शंका नाही.