
अजित पवार यांचा घातपात झाला असावा असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच या विमान दुर्घटनेत अनेक संशयास्पद गोष्टी आहेत असेही रोहित पवार म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, या घटनेबाबत त्यांनाही शंका आहे आणि ती पुढे काही मुद्द्यांद्वारे स्पष्ट होऊ शकते. त्यांनी सांगितले की, या विषयावर संशोधन आणि चर्चा करत असताना सुरक्षा क्षेत्रात काम केलेल्या एका माजी अधिकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधला. त्या अधिकाऱ्याने इस्रायल आणि ‘मोसाद’चा उल्लेख करत एका पुस्तकातील उदाहरण दाखवले. त्या पुस्तकात “एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करायचे असल्यास त्याच्या चालकाला मारणे हा सर्वात प्रभावी मार्ग असतो,” असे नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले की, ही घटना राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. “आमचा काका गेला, आमचा दादा गेला, महाराष्ट्राचा मोठा नेता गेला. ही घटना हलक्यात घेता येणार नाही. जोपर्यंत याची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले.
27 जानेवारीचा घटनाक्रम
पवार यांनी सांगितले की, 27 जानेवारीला कॅबिनेट बैठकीनंतर दादांनी काही अधिकारी, पक्षातील नेते आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे ठरवले होते. त्यानंतर ते गाडीने मुंबईला जाणार होते. ताफाही तयार होता आणि एका मोठ्या नेत्याची भेट ठरली होती.
मात्र, त्या नेत्याला उशीर झाल्यामुळे चर्चा उशिरापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे संध्याकाळी सुमारे 5.30 वाजता गाडीने जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. पर्याय नसल्याने विमान बुक करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संध्याकाळी 7.13 वाजता विमान बुक झाले.
पूर्व विदर्भातील नेत्याच्या फोननंतर फाईलवर सही
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व विदर्भातील एका नेत्याकडून फोन आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एका महत्त्वाच्या फाईलवर सही करणे आवश्यक असल्याचे कळले. ती फाईल मंत्रालयात असल्याने ती आणण्यात वेळ गेला आणि त्यामुळे प्रवासाचा आराखडा बदलला.
राजकीय सल्लागाराचा करार रद्द करण्याबाबत चर्चा
रोहित पवार यांनी सांगितले की, मागील तीन-चार महिन्यांत दादा आणि काही अधिकाऱ्यांमध्ये एका राजकीय सल्लागाराचा शेकडो कोटी रुपयांचा करार रद्द करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्या कराराचा काही फायदा होत नसल्यामुळे तो रद्द करण्याचा विचार सुरू होता.
बारामती येथील हॉस्टेलमध्ये झालेल्या एका बैठकीतही दादांनी काही लोकांना “राजकारण आम्हाला शिकवू नका, सर्वेक्षणाचे काम करा,” असे स्पष्ट सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.
विमान उड्डाणाबाबत दादांची भूमिका
रोहित पवार म्हणाले की, दादा नेहमी वैमानिकाच्या निर्णयाला प्राधान्य देत असत. उड्डाणापूर्वी ते नेहमी “उडायचे का नाही” याबाबत पायलटचा सल्ला घेत असत.
दोन-अडीच वर्षांपूर्वी लोणावळ्यात धुके वाढल्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण धोकादायक असल्याचे पायलटने सांगितले होते. त्यावेळी दादांनी उड्डाण रद्द करून गाडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला होता.
ईमेलमधील वैमानिकांची नावे बदलल्याचा दावा
रोहित पवार यांनी एका ईमेलचा उल्लेख करत सांगितले की, त्यात कॅप्टन साहिल आणि कॅप्टन यश अशी दोन नावे वैमानिक म्हणून सुचवली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी वैमानिकाचे नाव बदलण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
या सर्व घटनांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “सत्य समोर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.


























































