पोटनिवडणूक- मध्य प्रदेशात भाजपने वर्चस्व राखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशात 28 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखले आहे. बहुतांश जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्यानंतर भाजपालाच जास्त जागा मिळणार याचे संकेत मिळाले होते. मध्य प्रदेशात शिवराजसिंह यांचे सरकार स्थिर राहणार की पुन्हा कमलनाथ यांचे सरकार येणार अशी चर्चा पोटनिवडणुकांपूर्वी सुरू होती. दोन्ही पक्षांसाठी ही वर्चस्वाची लढाई होती.

कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदारांचे सदस्यत्व पक्षांतरामुळे रद्द झाल्यानंतर 28 जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सायंकाळपर्यंत एक जागा जिंकतानाच 19 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर होते. मध्य प्रदेशात बहुमतासाठी 115 जागा असणे आवश्यक आहे. 107 आमदार असणाऱया भाजपाला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आठ जागा हव्या होत्या.

तेलंगणात सत्ताधारी टीआरएसला धक्का

तेलंगणात दुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार एम. रघुनंदन राव यांनी सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) उमेदवार सुजाथा रेड्डी यांचा पराभव केला. टीआरएसचे आमदार सोलीपेता रामलिंगा रेड्डी यांच्या निधनामुळे या मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली होती.

कर्नाटकात दोन्ही जागांवर भाजपा

कर्नाटकमध्ये आर आर नगर आणि सीरा अशा दोन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. आर आर नगरमध्ये भाजपा उमेदवार मुनीरत्ना तर सीरा मतदारसंघात भाजपाचे राजेश गौडा हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या उमेदवारांचा पराभव केला.

मणिपूरमध्ये पाचपैकी चार जागा भाजपला

मणिपूरमध्ये पाच जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी वानगोई, सिनघाट, वांगजिंग तेंथा आणि सायटू मणिपूर या चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झाले. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

गुजरातमध्ये सर्व आठ जागांवर भाजपाचा विजय

गुजरातमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सर्व आठ जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत आता भाजपाचे 111 सदस्य झाले आहेत. पक्षांतर केलेल्या आमदारांना मतदार धडा शिकवतील अशी काँग्रेसची अपेक्षा होती. परंतु मतदारांनी सर्वच्या सर्व जागा भाजपाच्या पारडय़ात टाकल्या. राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. त्या आठपैकी पाच जणांना भाजपाने तिकीट दिले होते. ते या निवडणुकीत विजयी झाले. त्यात प्रद्युमनसिंह जडेजा, ब्रजेश मेरजा, अक्षय पटेल, जीतू चौधरी आणि जे. व्ही. काकडिया यांचा समावेश आहे.

हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, ओडिशात भाजपाचा पराभव

हरियाणामध्ये बरोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार इंदू राज नारवाल यांनी भाजपा उमेदवार योगेश्वर दत्त यांचा दहा हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला. ऑलिंपिकपटू दत्त हे दुसऱयांदा या मतदारसंघात पराभूत झाले आहेत. छत्तीसगडमध्ये मारवाही मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. के. के. ध्रुव यांनी भाजपा उमेदवार गंभीर सिंह यांना 38197 इतक्या मताधिक्क्याने धूळ चारली.

झारखंडमध्ये दुमका मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बसंत सोरेन यांनी भाजपा उमेदवार लुईस मरांडी यांचा तर बर्मे मतदारसंघात काँग्रेसचे पुमार जयमंगल ऊर्फ अनुप सिंग यांनी भाजपाचे योगेश्वर महातो यांचा पराभव केला.

ओडिशामध्ये बालासोर विधानसभा मतदारसंघात बीजू जनता दलाचे (बीजेडी) उमेदवार स्वरुप पुमार दास यांनी भाजपाचे मानस पुमार दत्ता यांचा पराभव केला.

नागालँडमध्ये दक्षिण अंगामी-1 मतदारसंघात एनडीपीपी पक्षाचे मेधो यहोखा हे विजयी झाले तर पुंगरो किपिरे मतदारसंघात अपक्ष उमेदवार टी. यांगसेओ संगथम हे विजयी झाले.