सोलापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी-नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोलापुरात 118.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विजांच्या कडकडाटास पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक भाग जलमय झाले आहेत. मुसळधार पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने काही भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बुधवारी रात्रीपासून सोलापूर शहर आणि आसपासच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4 इंच पाऊस पडला असून सोलापूर-तुळजापूर महामार्गावर पाणी साचले. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील जुना तुळजापूर नाका येथील नाला ओव्हरफलो झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दक्षिण हिंदुस्थानला मराठवाड्याशी जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असून या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

सोलापुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातही हाहाकार उडवला आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विडी घरकुल, दहिटणे, शेळगी आणि अक्कलकोट रोड परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागांतील अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना रात्रभर जागून घरातील साहित्य वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे भाऊ अक्कलकोटचे माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान, शेळगी कुमार स्वामी नगर येथून सात व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

शेतीचे मोठे नुकसान

बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील नाले, तलाव ओव्हरफ्लो होऊन परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिल झाले असून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निगडी व झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी द्राक्षबागाही उध्वस्त झाल्या आहेत.