भोपाळमध्ये कोरोना लसीची चाचणी केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू, भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत बायोटेकतर्फे भोपाळ येथे करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या चाचणीवेळी एका व्यक्तिचा मृत्यू झाला. कंपनी लसीकरण चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असताना ही घटना घडली असून लस दिल्यानंतर नवव्या दिवशी त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तिला कोरोनाची लस दिल्यानंतर सात दिवस त्याच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष देण्यात आले होते. लसीकरणाशी संबंधित सर्व नियम आणि अटी त्याला समजावून सांगण्यात आल्या होत्या. सात दिवसांनंतरही त्या व्यक्तित कोणतीही प्रतिकूल लक्षणे आढळली नव्हती. सात दिवसांनंतर केलेल्या तपासणीत तो पूर्णत: निरोगी आढळला.

याप्रकरणी भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेजद्वारा सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार येथील पोलिसांचे असे सांगितले की, लसीकरणानंतर कार्डीयॉरेस्पिरेट्री फेल्युअर झाल्यामुळे त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. शरीरात विष पसरल्याने त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. तसेच परीक्षण केंद्राकडून मिळालेल्या विशेष पडताळणी अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रत्यक्षात व्यक्तिच्या मृत्यूचा कोरोना लसीकरणाशी काहीही संबंध नाही. तसेच चाचणी केलेल्या व्यक्तिला कोरोनाची लस दिली होती की त्याच्यावर प्लेसिबो चाचणी केली होती याचा अजून खुलासा झालेला नाही, असे भारत बायोटेक कंपनीचे म्हणणे आहे.