
लहान मुले म्हटलं की मस्ती आली आणि मस्ती म्हटलं की धडपड, लागणं या गोष्टी आल्याच. पण कधीकधी हीच मस्ती जीवावर बेतते, अशीच एक घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. फुगा फुगवताना फुगा तोंडात गेल्यामुळे 10 वर्षीय मुलाचा तडफडून मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील एका गावात राहणारा 10 वर्षीय बॉबी हा पाचवीत शिकत होता. गुरुवारी दुपारच्या दरम्यान तो नेहमीप्रमाणे घराबाहेर मित्रांसोबत खेळायला गेला होता. खेळत असताना त्याने आपल्या हातातील फुगा तोंडात धरून फुगवायला सुरुवात केली, मात्र अचानक फुगा फुगवताना फुगा फुटला आणि फुग्याचा एक तुकडा बॉबीच्या तोंडात गेला. फुगा तोंडात गेल्यामुळे त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला आणि तसाच तो जमिनीवर पडला. त्याच्या सोबत खेळणारी इतर मुले घाबरली आणि त्यांनी बॉबीच्या घरच्यांना याची माहिती दिली.
कुटुबीयांनी बॉबीला तात्काळ रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी बॉबीला मृत घोषित केले. दहा वर्षांच्या हसत्या खेळत्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे.





















































