हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता पुन्हा एकदा आक्रमकपणे सुरू झाले आहे. इस्रायलने गाझाच्या दराज जिह्यातील एका शाळेवर शनिवारी सकाळी हल्ला चढवला. या हल्ल्यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. इस्रायल अनेक ठिकाणी हल्ले करत आहे. गाझातील अनेक लोकांनी या शाळेत आश्रय घेतला होता. सकाळची नमाज अदा करत असताना हा हल्ला झाला. या शाळेवर एकामागून एक तीन रॉकेट पडले. त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र आग पसरली, धूर पसरला. अनेकांना पळणेही मुश्कील झाले.
गुरुवारी गाझामधील दोन शाळांवर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांनंतर हा हल्ला झाला. ज्यामध्ये किमान 18 लोक मारले गेले. गाझा शहरातील बॉम्ब झालेल्या शाळेत पॅलेस्टिनी लोक अडकले आहेत. इस्रायली लष्करानेही पाणीपुरवठा खंडित केल्याने आग विझवण्यात अडचण येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही इस्रायलने गाझामधील दोन शाळांवर हवाई हल्ले केले होते. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जण जखमी झाले होते.
हल्ला भयानक होता
इस्रायलने शनिवारी केलेला हल्ला भयानक होता. यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे हमासचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी सांगितले.
दहशतवाद्यांवर हल्ला
इस्रायली लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. अल-ताबीन शाळेचा वापर हमासचे कार्यालय म्हणून केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तेथे हमासचे अनेक दहशतवादी राहत होते. त्यामुळे आम्ही त्या शाळेवर हल्ला केला. आम्ही नागरिकांवर हल्ला केला नसून दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे, असे स्पष्टीकरण इस्रायल लष्कराने दिले आहे.