घरातील ११ पाइपमुळे बुराडी आत्महत्येचे गूढ वाढले

15

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीच्या बुराडी भागातील संतनगरात एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह आढळलेल्या घरात ११ पाइप आढळल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. तसेच ‘तुम्ही टेबलाचा कापर करून डोळे बंद केले आणि हात बांधले, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल,’ असा मजकूर असलेली वही हाती लागली आहे. यावरून अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने या कुटुंबाने अगदी थंड डोक्याने आत्महत्या केल्याचा कयास बांधला जात आहे.

घराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला अगदी जवळ-जवळच ११ पाइप रोवलेले आढळून आले आहेत. यातील ७ पाइप सरळ, तर ४ पाइप वळलेले आहेत. विशेष म्हणजे घरातील मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश होता. या पाइपमधून पाणी बाहेर पडल्याच्याही कोणत्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे हे पाइप नेमके कशासाठी लावण्यात आले होते, या पाइपचा मृत्यूशी काही संबंध आहे काय याचा तपास पोलीस करत आहेत. हे पाइप आणि सापडलेल्या वहीमुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

दोन रजिस्टर, डायरीत मोक्ष, मृत्यूचा मजकूर

पोलिसांना हाती लागलेल्या दोन रजिस्टरमध्येही मोक्ष कसा मिळवाल याची माहिती आहे. मृतदेहाच्या गळय़ाभोवती गुंडाळलेल्या ओढण्यांवरही धार्मिक संदेश आहेत. घरात सापडलेल्या डायरीतही अध्यात्मिक गोष्टी, मोक्ष, मृत्यूसंबंधी मजकूर आहे. कुटुंबातील कोणी कोठे लटकवून जीव द्यावा याची नोंदही रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह नोंदीप्रमाणेच लटकलेल्या अवस्थेत होते.

हत्या झाल्याचा बहिणीचा दावा

मृतांमधील ललित व भूपी या भावांची बहीण सुजाता यांनी हे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते, पण मंत्र-तंत्र आणि बुवाबाजीच्या आहारी गेलेले नव्हते. त्यामुळे हा प्रकार आत्महत्या नसून, हत्याच आहे, असा दावा केला आहे. प्रकरणाची फाइल बंद करण्यासाठी पोलीस अंधश्रद्धेचा प्रकार ठरवत आहेत, असा आरोप करून सुजाता यांनी घराचा दरवाजा उघडा होता ही बाबही निदर्शनास आणून दिली आहे

आपली प्रतिक्रिया द्या