
कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागासमोर अकरावी प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे. राज्यात एसएससीसह सीबीएसई, आयसीएसई, आयबी यासह अन्य केंद्रीय बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या रांगेत उभे असतात. या सर्व बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशात सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये समानता कशी आणायची यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी शालेय शिक्षण विभागाच्या तज्ञ समितीची पहिली बैठक पार पडली. बैठकीत दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, अकरावी प्रवेश अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.
अकरावीच्या प्रवेशासंदर्भात या बैठकीत केवळ प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांकडून देण्यात आली. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, नागपूर आदी महानगरपालिका क्षेत्रांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही मुंबई उच्च न्यायालयाने गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने होते. परंतु आता दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्याने ही प्रवेश प्रक्रिया कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई, पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी एखादी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता येईल का, अकरावीची प्रवेश परीक्षा कशी असेल अशा विविध पर्यायांचा विचार या बैठकीत करण्यात आला आहे.
या पर्यायांवर प्राथमिक स्तरावर चर्चा
- अकरावी प्रवेशात अधिक स्पर्धा असलेल्या जिह्यांत सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय देण्यासाठी प्रवेश परीक्षेचा विचार.
- इतर बोर्डांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी अवलंबलेल्या मूल्यमापनाच्या निकषांचा विचार राज्य मंडळाचा निकाल जाहीर करताना करणार.
- एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापन किंवा नववी आणि दहावीच्या संयुक्त मूल्यमापन पद्धती अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यावर चर्चा.






























































